मुंबईची वाढती लोकसंख्या आणि शहरावरील वाढलेला ताण लक्षात घेता, पुढील २० ते २५ वर्षांमध्ये मंत्रालय आणि महत्वाची सरकारी कार्यालय मुंबईबाहेर हलवली जाऊ शकतात. पंढरपूर शहरात विविध विकासकामांच्या भूमिपुजन सोहळ्यासाठी आलेल्या, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी हे विधान केलं आहे. शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत असताना रणजित पाटील बोलत होते.

मुंबईवरील लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबईजवळ ‘नयना’ नावाचे नवीन शहर विकसीत करण्याचे काम सुरु झाले. ज्या पद्धतीने चंदीगढ आणि नवी मुंबई या शहरांची नियोजनपद्धतीने उभारणी करण्यात आलेली आहे, त्याच आधारावर नयना शहर उभारलं जाईल असं पाटील म्हणाले. मुंबईसारख्या शहरात दररोज येणाऱ्या लोकसंख्येचं विकेंद्रीकरण व्हावं यासाठी हा निर्णय घेणं गरजेचं असल्याचं मत पाटील यांनी व्यक्त केलं. मंत्रालयासोबत दक्षिण मुंबई परिसरातील शासकीय कार्यालये भविष्यकाळात मुंबईबाहेर हलवली जाऊ शकतात, असेही संकेत पाटील यांनी दिले आहेत.