पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पदावर विराजमान झाल्यापासून देशात स्वच्छता अभियानास वेग आला. देशात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जाते. अनेकजणांनी या कामासाठी स्वत:ला वाहून घेतल्याचे पाहायला मिळते. परंतु, लातुरात एका दाम्पत्याने तर एक वेगळाच आदर्श सर्वांसमोर उभा केला आहे. या दाम्पत्याने आपल्या नवजात मुलीचे नाव चक्क स्वच्छता असे ठेवले आहे. लातुरातील मोचीगल्ली येथे राहणारे मोहन कुरील व काजल कुरील असे या दाम्पत्याचे नाव आहे.

कुरील दाम्पत्यांना दि. २१ फेब्रुवारीस कन्यारत्न प्राप्त झाले. या दाम्पत्याने मुलीच्या जन्मानंतर तिचे नाव स्वच्छता ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी महापालिकेच्या जन्मनोंदणी विभागात तशी नोंदही केली. त्यांच्या या निर्णयाचे आता लातूर शहरात कौतुक केले जात आहे. मुलीच्या नामकरणावेळी महापालिका उपायुक्त त्र्यंबक कांबळे, सुभाष पंचाक्षरी, नगरसेवक विक्रम गोजमगुंडे आदींसह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. स्वच्छताला लातूरची ब्रँड अॅम्बेसेडर बनवावे आणि प्रशासनाने तिला दत्तक घ्यावे असे, आवाहन गोजमगुंडे यांनी केले आहे.