“महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल,” अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्या लेखातून साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, राऊत यांच्या या भूमिकेवर मनसे नेत्यांनी काहीशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. आधी संदीप देशपांडे त्यानंतर आता मनसेच्या सिनेमा विंगचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी राऊत यांना सुनावलं आहे.

“शॅडो संपादक महाशय, अगदी रोखठोकपणे सांगायचं तर महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर फायरब्रँड एकच…राजसाहेब ठाकरे” अशा शब्दांत खोपकर यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे.

खोपकर म्हणाले, “सगळीकडून कोंडीत सापडलात म्हणून लगेच तुम्हाला ठाकरे ब्रँडचं कसं होणार अशी चिंता वाटत असली तरी ती तुमच्यापर्यंतच ठेवा. मनसैनिकांना राज ठाकरे या ब्रँडबद्दल, त्यांच्या लोकप्रियतेबद्दल कधीही शंका नव्हती आणि भविष्यात कधी असणार नाही. तुम्ही तुमचा स्वाभिमान गुंडाळून ठेवलाय, पण त्यात आमच्या राजसाहेबांना खेचू नका. एक मात्र खरं, तुमचा आवाज लेख सगळीकडे व्हायरल झालाय तो राजसाहेबांच्या उल्लेखामुळेच, हे ध्यानात असू द्या.

दरम्यान, संदीप देशपांडे म्हणाले होते, मी जे बोलतोय ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही तर माझं मत आहे. पक्षाची अधिकृत भूमिका राज ठाकरे मांडतील. संजय राऊत यांच्या रोखठोकमधील सादेला उत्तर देताना देशपांडे म्हणाले, “महाभारतामध्ये कर्णाच्या रथाचं चाक जेव्हा जमिनीत रुतलं होतं तेव्हा कृष्णाने कर्णाला जो प्रश्न विचारला तोच मला आज शिवसेनेला विचारायचा आहे. अभिमन्यू जेव्हा एकटा लढत होता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म कर्णा?”