भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवं हेच चांगलं आहे असं मला वाटतं.  मात्र सद्यस्थितीत दोन्ही पक्षांना ते मान्य नसल्याचं दिसतं आहे असं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे. ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक पार पडली. त्यानंतर निकाल लागला तो महायुतीच्या बाजूने मात्र शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी लावून धरली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये काडीमोड झाला आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हात मिळवत मुख्यमंत्रीपद मिळवलं. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यानंतर आता मनोहर जोशी यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले आहेत मनोहर जोशी?

” माझ्या मते भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र राहयला हवं. मात्र सद्यस्थितीत हे दोन पक्षांना हे मान्य असावं असं वाटत नाही ”

मनोहर जोशी यांनी केलेलं हे वक्तव्य अर्थातच खळबळजनक आहे. कारण निवडणूक होण्यापूर्वी हे भाजपा आणि शिवसेना हे दोन पक्ष एकत्र लढले होते. निवडणूक निकाल लागला तो कौलही महायुतीलाच मिळाला होता. त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. मात्र शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळालंच पाहिजे असा दावा केला होता. मात्र यावरुन या दोन्ही पक्षांमध्ये काडीमोड झाला.

या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवत महाराष्ट्रात शिवसेनेने सत्ता स्थापन केली. या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार व्हायचा आहे. अवघ्या तेरा दिवसातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र यायला हवं असं वक्तव्य केलं आहे.