News Flash

पनवेलमध्ये भाजप आणि शेकाप आघाडीत चुरस

गेल्या विधानसभा निवडणुकीत पनवेलमध्ये भाजपचा आमदार निवडून आला होता.

पनवेल महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी ठाकूर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत पनवेलमध्ये भाजपचा आमदार निवडून आला होता. शेकाप, काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास करणारे आमदार प्रशांत ठाकूर हे भाजपचे नेतृत्व करीत असून, कोकणाचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी ठाकूर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे ठाकूर यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी शेकापने आव्हान दिले आहे.

शेकापने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची मोट बांधत भाजप विरोधात महाआघाडीचे आव्हान उभे केले तर भाजपने पंतप्रधान मोदी यांचे नाव व चेहऱ्याचा जप करत मोदी लाटेचा लाभ घेण्यावर भर दिला आहे. या निवडणुकीपूर्वी शिवसेनेने भाजपला युतीसाठी दिलेल्या नकारामुळे या निवडणुकीत स्वबळावर लढणारी शिवसेना भाजपच्या मत विभागणीचे खरे कारण ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेकापसह दोन राजकीय पक्षांची आघाडी त्यानंतर नैसर्गिक मित्र म्हणवणारी शिवसेना असा दुहेरी सामना भाजपला करावा लागत आहे. खारघर व कळंबोली येथील दोन वेगळ्या विकास आघाडय़ांमुळे काही ठिकाणी तिरंगी लढतीऐवजी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

पनवेल महापालिकेच्या या पहिल्याच निवडणुकीत साऱ्या पक्षांपुढे एक आव्हान आहे व ते म्हणजे गावाला गेलेले मतदार मतदानाच्या दिवशी परततील याचे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी काँग्रेसमध्ये असल्यापासून केलेल्या विकासकामांचा कित्ता पुन्हा पालिकेच्या निवडणुकीत गिरवून मते मागण्यासाठी जाहिरातबाजी सुरू केली आहे. तसेच शेकापने आपले लक्ष मोठय़ा प्रमाणात डिजिटल प्रचार व जाहिरातबाजीवर या वेळी केंद्रित केल्याने ही निवडणूक सत्तेत असलेल्या भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. आमदार ठाकूर यांचे बंधू परेश हे प्रभाग १९ मधून (पनवेल शहर) निवडणूक लढवत असल्याने स्वत: ठाकूर कुटुंबीयांनी या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले आहे. शहराच्या बाजूने जाणारा उन्नत मार्ग (उड्डाणपूल), नाटय़गृह, प्रस्तावित रुग्णालयाच्या बांधकामाच्या निधीसाठी सरकारकडे केलेला पाठपुरावा, पनवेल शहरात बांधलेले काँक्रीटचे रस्ते, कामोठे येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडे केलेला पाठपुरावा अशी ठळक कामे ठाकूर मांडत आहेत. शेकापने पाणीटंचाई, कचरा उचलण्यात होणारी बेपर्वाई, अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, अस्वच्छता व आरोग्याचा प्रश्नाला ठळक प्रसिद्धी देऊन मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे.

तिरंगी लढतीत चुरस

खारघर व उलव्याप्रमाणे शेकाप सत्तेत आल्यास नव्याने मद्यविक्रीच्या परवान्यांना विरोध केला जाईल, असे आश्वासन देऊन शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी महिलावर्गाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. शेकाप महाआघाडीने पाचशे खाटांचे सरकारी रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, पालिकेच्या शाळेतून सीबीएसई दर्जाचे शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. भाजप, शेकाप-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी, शिवसेना अशा तिरंगी लढतीत कोणाला कशी मते मिळतात, यावर बरेचसे अवलंबून आहे. भाजपचा पराभव करणे हे शेकाप आणि शिवसेनेचे समान ध्येय आहे. काहीही करून ठाकूर यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा शेकापचा प्रयत्न आहे.

ठाकूरच लक्ष्य

ठाकूर कुटुंबीयांनी यापूर्वी पक्षांतरांची चर्चा घडवून आणून त्यांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेपूर्वी नगरपरिषदेमध्ये ठाकूर समर्थकांची सत्ता होती. त्यामुळे सत्ता असतानाही पनवेलचा कायापालट करण्यास आमदार ठाकूर अपयशी कसे ठरले हे प्रचाराच्या माध्यमातून त्यांचे विरोधक वेळोवेळी मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. आमदार ठाकूर यांनी मात्र पंतप्रधान मोदी व मुख्य फडणवीस यांच्या स्वच्छ प्रतिमेचा लाभ तसेच यापूर्वी केलेल्या विकासकामांना आपल्या प्रचारात स्थान दिले आहे. ग्रामपंचायतींवर शेकापची सत्ता असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चर्चा भाजपकडून निवडणुकीच्या काळात घडवून आणली जात आहे. शिवसेने मात्र या वेळी पनवेल पालिका स्वबळावर लढवून खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन केले आहे. मंत्री एकनाथ शिंदे व आदेश बांदेकर यांच्यावरील जबाबदारीने ही निवडणूक शेकाप व भाजपसाठी चुरशीची ठरणार आहे. पंचवीस वर्षांत हे पहिल्यांदा घडल्यामुळे सामान्य शिवसैनिकांना बळ मिळाले आहे. मंत्री शिंदे यांचे सैनिकांना मिळणारे बळ तसेच नवी मुंबई, ठाणे व मुंबईतील काही आमदार, नगरसेवक, शाखाप्रमुख यांना प्रत्येक प्रभागात निरीक्षक म्हणून नेमल्याने पनवेलची निवडणूक मुंबई पालिकेच्या चष्म्यातून पाहीली जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 1:36 am

Web Title: in panvel civic polls fight between bjp and pwp alliance
Next Stories
1 परभणीतील नव्या राजकीय समीकरणाने राष्ट्रवादीची खेळी फसली
2 जयंत पाटील यांचे पंख कापण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न
3 पश्चिम विदर्भ राखण्याचे शिवसेनेपुढे आव्हान
Just Now!
X