रस्त्याच्या दुभाजकाचे काम सुरू असताना पाऊस येत होता. म्हणून आपल्या चार वर्षाच्या चिमुकलीला आईने डंपर खाली झोपवले, मात्र तोच डंपर तिच्या अंगावरून गेल्याने त्या चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भोसरी येथे ही घटना घडली. विशेष म्हणजे ही घटना भोसरी एम.आय.डी.सी पोलिस ठाण्याच्या समोरच घडली. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. केवळ तक्रार अर्ज घेण्यात आला आहे.त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न येथील पोलीस करत नाहीत ना अशी शंका उपस्थित होत आहे.

निरंजली रामन्ना कबार (४) असे डंपर खाली येऊन मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी अद्याप आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले नाही. अधिक तपास भोसरी एम.आय.डी.सी पोलीस करत आहेत. अधिक माहिती अशी की,कबार दांम्पत्य मजुरी करतात ते भोसरी एम.आय.डी.सी पोलीस ठाण्याच्या समोरच रस्ता दुभाजकाचे काम करत होते.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रिमझिम पाऊस आल्याने त्यांनी आपल्या चार वर्षाच्या चिमुकलीला एम.एच-१२ सी.पी-१०५७ या नंबरच्या डंपर खाली झोपवले होते. चिमुकलीचे आई वडिल कामात व्यस्त असताना नकळत डंपर चालक आला आणि गाडी पाठमागे घेताना चिमुरडीच्या अंगावरून चाक गेले यात निरंजली गंभीर जखमी झाली तिला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना पावणे आठच्या सुमारास तिचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कामगार वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.