रायगड जिल्ह्यातील करोना बाधितांची आकडा शंभरीपार गेला आहे. जिल्ह्यात दिवसभरात १३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १२ जणांचा समावेश आहे.

पनवेल महानगर पालिका हद्दीत करोना बाधितांची संख्या ८१ झाली आहे. यातील २८ जण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या ५१ जणांवर उपचार सुरु आहेत. पनवेल महानगर पालिका हद्दीत आत्तापर्यंत करोना मुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.  तर रायगड जिल्ह्यातील ग्रामिण भागात करोनाचे २९ रुग्ण आढळून आलेत. यातील १५ जण पुर्ण बरे झाले आहेत. महाड आणि पोलादपूर येथील २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १२ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा ११० वर पोहोचला आहे. यातील ४३ जण बरे झाले आहेत. ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६३ जणांवर मुंबई, नवीमुंबई आणि पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

महाराष्ट्रात २४ तासात १००८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ही आता ११ हजार ५०६ इतकी झाली आहे. आज १०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत १८७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.