रायगड जिल्ह्यात दिवाळीनंतर करोनाचा आलेख पुन्हा उंचावण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १२६ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. १५९ जणांनी करोनावर मात केली. दिवसभरात करोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यात ८४८ करोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. यातील ४१३ जणांवर गृह विलगीकरणात उपचार सुरु आहेत. १०९ जणांना प्राणवायू पुरवठा करावा लागत आहे. तर १९ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

रायगड जिल्ह्यातील ५५ हजार ८५३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. हे प्रमाण एकुण रुग्ण संख्येच्या ९६ टक्के आहे. जिल्ह्यात सध्या सक्रीय रुग्णांचे प्रमाण १ टक्के आहे. तर मृत्यूदर ३ टक्यावर स्थिर आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १५६ दिवसांवर पोहोचला आहे. मात्र दिवाळीनंतर करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे.  ही  एक चिंताजनक बाब आहे.

जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या आता ५५ हजार ८५३ वर पोहोचली आहे. यापैकी ५३ हजार ३१६ जणं करोनातून पुर्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात १ हजार ५८९ जणांचा आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णाची संख्या दिवसागणिक वाढण्यास सुरूवात झाली आहे.  जिल्ह्यात सोमवारी १२६ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. यात पनवेल मनपा हद्दीत ८५, पनवेल ग्रामिण १७, उरण १, खालापूर २, कर्जत १, पेण २, अलिबाग ८, माणगाव २, रोहा ६, श्रीवर्धन १, महाड मधील १ रुग्णांचा समावेश आहे. मुरुड, तळा, सुधागड, म्हसळा, आणि पोलादपूर या तालुक्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात सध्या ८८२ करोनाचे रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ४२६,  पनवेल ग्रामिण २३५, उरण ३०, खालापूर २७, कर्जत ९, पेण ३५, अलिबाग ३९, मुरुड १, माणगाव ७, तळा १, रोहा १८, सुधागड ८, श्रीवर्धन ३, म्हसळा २, महाड ७, पोलादपूर येथील ० रुग्णांचा समावेश आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १५६ दिवसांवर पोहोचला आहे.