मुंबईसह कोकणात मागच्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. याच काळात सहलीसाठी धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सवतकडा धबधब्यावर घडलेल्या घटनेनंतर रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाऊस सुरु असेपर्यंत जिल्ह्यातील सर्व धबधबे, धरणांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे.

खबदारीचा उपाय म्हणून कुठलीही अप्रिय घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सवतकडा धबधब्यावर सहलीसाठी आलेले तेरा जण पाण्याचे पात्र ओलांडून पलीकडे गेले. त्याचवेळी पावसाचा जोर वाढल्याने सर्वजण समोरच्या टोकाला अडकून पडले होते. अखेर रत्नागिरी माऊंटेनियर्सच्या सदस्यांनी सर्वांची सुटका केली.

दोन दिवसापूर्वीच वसईतील चिंचोटी धबधब्याजवळ पोहायला गेलेले १०६ पर्यटक अडकले होते. पण या सर्वांची सुटका करण्यात आली. धोकादायक परिस्थितीत अडकलेल्या पाच जणांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. चिंचोटी धबधब्यावर पायी जाण्यासाठी दोन तास लागतात. त्यामुळे वसईच्या तहसीलदारांकडे हेलिकॉप्टरची मागणी केली. यानंतर हेलिकॉप्टरच्या मदतीने पर्यटकांना सोडवण्यात आले.

यातील एका पर्यटकाचा मृत्यू झाला . भावेश गुप्ता असे या तरूणाचे नाव आहे. भावेश गुप्ता हा मुंबईतील कांदिवलीचा रहिवासी होता.
शनिवारचा दिवस असल्याने वसई पूर्व भागात असलेल्या चिंचोटी धबधब्याजवळ अनेक पर्यटकांनी गर्दी केली होती. हा धबधबा धोकादायक आहे तरीही तिथे बऱ्याचदा पर्यटक गर्दी करतात. पाऊस सुरू असल्याने पावसाचा आनंद लुटण्यासाठी एकूण १०७ पर्यटक गेले होते.