सोलापूर : करोनाचा फैलाव वेगाने होत असलेल्या सोलापुरात टाळेबंदीसाठी रस्त्यावर अहोरात्र पहारा देणाऱ्या पोलिसांनाही करोनाचा प्रादुर्भाव होऊ  लागला आहे. एकमेकांच्या संपर्कातून १६ पोलीस कर्मचारी करोनाबाधित झाले असून आणखी किमान शंभर पोलिसांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

करोनाची बाधा झालेले १३ पोलीस कर्मचारी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील आहेत, तर तीन पोलीस कर्मचारी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील आहेत. यातील एका सहायक फौजदाराचा मृत्यू झाला आहे.

करोनाचा फैलाव टाळण्यासाठी देशभर टाळेबंदी तथा संचारबंदी लागू झाल्यानंतर २३ मार्चपासून पोलीस रात्रंदिवस रस्त्यावर पहारा देत आहेत. यापैकी काही पोलीस तर करोनाचे रुग्ण आढळून आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. शहरातील तेलंगी पाच्छा पेठेत १२ एप्रिल रोजी करोनाबाधित पहिला रुग्ण सापडल्यानंतर त्यापाठोपाठ रुग्णांची संख्या उत्तरोत्तर वाढत चालली आहे. काल शनिवारपर्यंत २८ दिवसांत करोना रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत १५६ वर जाऊ न पोहोचली आहे. यात १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाग्रस्त भाग बहुतांश दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या झोपडपट्टय़ांशी संबंधित आहे.

एकमेकांच्या संपर्कामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत असताना गेल्या आठवडय़ात सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाबाधा झाल्याचे दिसून आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात हलवून त्यांची वैद्यकीय चाचणी घेतली असता त्यापैकी आणखी दोन पोलिसांना करोनाबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पुन्हा नऊ  पोलिसांना करोनाने ग्रासल्याचे आढळून आले. तर दुसरीकडे सोलापूर शहरातील तीन पोलिसांनाही करोनाची बाधा झाली असून यातील एका सहायक फौजदाराचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या संपर्कातील शंभरपेक्षा अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही वैद्यकीय चाचणी करण्यात येत असून त्याचे निष्कर्ष अद्यापि समोर आले नाहीत. एकंदरीत पोलिसांना करोनाचा विळखा पडू लागल्यामुळे यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

एकाच दिवशी ४८ करोनाबाधित

करोनाचा फैलाव सोलापुरात झपाटय़ाने वाढत असून रविवारी एकाच दिवशी उच्चांकी ४८ करोनाबाधित रुग्ण सापडले. यात नऊ  पोलिसांचाही समावेश आहे. याशिवाय काही आरोग्य कर्मचाऱ्यांनाही करोनाबाधा झाली आहे. आतापर्यंत करोनाबाधित रुग्णसंख्या २६४ वर पोहोचली असून यात १४ मृतांचा समावेश आहे. रविवारी सायंकाळी सहापर्यंत करोनाशी संबंधित संशयित रुग्णांची वैद्यकीय चाचणी केलेले १३२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४८ व्यक्तींना करोनाबाधा झाल्याचे दिसून आले. यात २९ पुरुष तर १९ महिला आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एकाचवेळी नऊ  पोलिसांनाही करोनाची बाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला. यात सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील संजीवनगरासह गजानन नगर (जुळे सोलापूर), बजरंगनगर (होटगी रोड), सम्राट चौक, मंत्री—चंडक नगर (भवानी पेठ), रविवार पेठ, मुरारजी पेठ पोलीस वसाहत तसेच जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील पाटकूल, ढोक बाभुळगाव आदी ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांचा समावेश आहे. आज नव्याने आढळून आलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक ८ रुग्ण सिध्देश्वर पेठेतील असून त्याशिवाय शनिवार पेठेत सात रुग्ण, तर लष्कर (सदर बझार) येथे चार रुग्ण सापडले. एकूण ३२ ठिकाणी रुग्ण सापडले. जिल्ह्यात ग्रामीण भागात मोहोळ व सांगोला येथे दोन करोनाबाधित रुग्ण यापूर्वी सापडले होते. त्यानंतर आता मोहोळ तालुक्यात पुन्हा तीन रुग्ण आढळून आले आहेत.

‘त्या’ कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याच्या सूचना

सोलापूर ग्रामीण विभागात ५५ वर्षे पूर्ण केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रस्त्यावर पहारा देण्याचे काम न देता त्यांना घरीच बसून राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोलापूर ग्रामीणमध्ये वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेले १४ पोलीस अधिकारी व १३८ कर्मचारी आहेत.