सोलापूर शहर व जिल्ह्यात करोना विषाणूचे संकट वरचेवर वाढत आहे. बाधित रूग्णांवरील औषधोपचाराचाही खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. म्हणूनच शासनाने सामान्य गरीब बाधित रूग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचाराची सोय उपलब्ध केली असली, तरी सोलापुरात मात्र ही योजना कागदावरच असल्याचे दिसून येते.

शहरात आतापर्यंत बाधित रूग्णसंख्या चार हजारांच्या पुढे जाऊन मृतांची संख्याही ३३३ वर पोहोचली आहे. मात्र महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ केवळ ५१४ बाधित रूग्णांना मिळाला आहे. त्यासाठी एक कोटी ३१ लाख ७५ हजारांचा भार शासनाने उचलला आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यात मिळून ४१ रूग्णालयं महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी जोडली गेली आहेत. प्रत्यक्षात त्यापैकी जेमतेम नऊ रूग्णालयांमध्ये ही योजना सुरू आहे. यात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयासह अश्विनी ग्रामीण रूग्णालय (कुंभारी), अश्विनी सहकारी रूग्णालय, सोलापूर मार्कंडेय सहकारी रूग्णालय, गंगामाई हॉस्पिटल, नवजीवन हॉस्पिटल व यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचा समावेश आहे. यापैकी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रूग्णालयात २६२ रूग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे मोफत उपचार झाले आहेत.

तर अश्विनी ग्रामीण-१३९, सोलापूर मार्कंडेय-७३, अश्विनी सहकारी-८, यशोधरा-१८, गंगामाई-१३ याप्रमाणे रूग्णांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. दीपक वाघमारे यांनी माहिती दिली. योजनेची प्रभावी अंमलबजावणी अद्यापि होऊ शकत नसल्यामुळे गोरगरीब करोनाबाधित रूग्णांना औषधोपचार घेणे ही आवाक्याबाहेरची बाब ठरली आहे. या योजनेसाठी ठरविण्यात आलेले निकषही जाचक आहेत. बाधित रूग्ण रूग्णालयात दाखल झाल्यानंतर व्हेंटिलेटरवर दहा दिवस उपचार घेत असेल, तर त्याला महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळू शकतो. किंवा विना व्हेंटिलेटर सात दिवस उपचार घेणारा रूग्ण या योजनेसाठी पात्र मानला जातो. व्हेंटिलेटरवर दहा दिवस उपचार घेणाऱ्या रूग्णासाठी ५० हजार रूपये तर विना व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या रूग्णासाठी २५ हजार रूपये याप्रमाणे लाभ मिळतो. सोलापुरात या योजनेला लाभ देणाऱ्या रूग्णालयांमध्ये एकूण खाटांची उपलब्धता १३ हजार २८५ एवढी आहेत. यात ७२९ खाटा अतिदक्षता विभागाशी संबंधित आहेत.