गेल्या तीन-चार आठवडय़ांपासून पावसाचा रुसवा सुरूच असताना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट आहे. कळंब व उस्मानाबाद तालुक्यांत अन्य तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक पाणीटंचाई आहे. कळंब व परिसरातील ३० गावांना दुष्काळाच्या झळा तीव्रतेने सहन कराव्या लागत आहेत. एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी न चुकणारी धावपळ, तर दुसरीकडे मांजरा धरणातून लातूर एमआयडीसीसाठी दिवसाढवळ्या सुरू असणारी पाणीचोरी, असा विरोधाभास पाहावयास मिळत आहे. लातूर एमआयडीसीतील काही उद्योजक व पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमताने ऐन दुष्काळात हा चोरीचा मामला राजरोस सुरू ठेवला आहे. मांजरा धरणातील पाण्याची काही उद्योजकांकडून चोरी होत असल्याच्या प्रकाराला उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला.
उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांना मांजरा मध्यम प्रकल्पाचा नेहमीच आधार राहिला आहे. ऐन पाणीटंचाईच्या काळात या प्रकल्पाने दोन्ही जिल्ह्यांची तहान भागविण्याचे काम वेळोवेळी केले. यंदा मात्र प्रकल्पाने तळ गाठला आहे. पाणीपातळी मृतसाठय़ाच्या खाली गेली आहे. या प्रकल्पावरून तब्बल ११ पाणीपुरवठा योजना सध्याही सुरू आहेत. या योजनांमधून कळंब व परिसरातील सुमारे तीसहून अधिक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. दुष्काळाचे सावट, भविष्यात निर्माण होणारी तीव्र पाणीटंचाई व उपलब्ध पाणी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने मांजरा प्रकल्पातील संपूर्ण साठा केवळ पिण्यासाठी आरक्षित केला आहे. त्यामुळे या प्रकल्पावरील कृषीपंप व अन्य वापरासाठी होणारा पाण्याचा वापर बंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यात भीषण दुष्काळ असतानाही मांजरातील पिण्याचे पाणी लातूर येथील एमआयडीसीला चोरून नेले जात असल्याचे उघड झाले आहे. पाटबंधारे विभागाचे काही अधिकारी व उद्योजकांच्या संगनमताने ही पाणीचोरी सुरू आहे. पाणीसाठा जोत्याखाली गेल्यामुळे उद्योगधंद्यांसाठी पाणी नियमानुसार उचलता येत नाही. जोत्याखालील पाण्याचा उपसा होऊ नये, या साठी वीजपंपही जोत्याच्या पातळीवर बसविण्यात आले आहेत. याला बगल देत चक्क जोत्याखालील पाण्याला कालवा तयार करून या पाटातील पाणी एमआयडीसीसाठी दोन पंपांद्वारे दररोज मोठय़ा वेगात उपसले जात आहे.
जिल्ह्यात मागील पाच वर्षांपासून अवर्षण मुक्काम ठोकून आहे. यंदा जिल्ह्यात केवळ ८५ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सगळीकडचे पाणीसाठे झपाटय़ाने तळाकडे गेले आहेत. मांजरा धरणानेही तळ गाठला आहे. प्रकल्पाच्या तळातील भेगा स्पष्ट दिसू लागल्या आहेत. दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र झाल्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात अधिक तीव्र होऊ नये, या साठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. एकीकडे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे पिण्यासाठी आरक्षित केलेल्या पाण्याची लातूर एमआयडीसीकडून चक्क चोरी केली जात आहे. विशेष म्हणजे पाटबंधारे विभागातील अधिकारी या चोरीकडे हेतुत डोळेझाक करीत आहेत. प्रकल्पात केवळ एक महिना पुरेल इतकाच मोजका पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, ज्या वेगाने एमआयडीसीकडून पाण्याची चोरी केली जात आहे, तो वेग कायम राहिल्यास काही दिवसांतच प्रकल्प कोरडाठाक पडण्याची दाट शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले
धरणातील पाण्याची चोरी होत असल्याच्या प्रकाराबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे लक्ष वेधले असून या प्रकरणी कारवाई करण्याची विनंती केली. जिल्ह्य़ात अभूतपूर्व पाणीटंचाई आहे. त्यामुळे परिसरातील पाणीसाठे पिण्यासाठी आरक्षित ठेवणे गरजेचे आहे. या संदर्भात योग्य निर्णय घेण्याची ग्वाही मंत्री डॉ. सावंत यांनी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.