नव्या महिला धोरणाचा अंतिम आराखडा तयार आहे. त्याच्यासह बालविकासाचे धोरण लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडले जाईल, असे महिला व बालकल्याण विकासमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज जिल्हा काँग्रेसने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात बोलताना सांगितले.
यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात आयोजित केलेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे होत्या. महिलांचे नाव सात-बारावर स्वेच्छेने लावण्याची सरकारची सूचना असली तरी त्याचे पालन होत नसल्याने सात-बारावर सक्तीने पत्नीचे नाव लावावे, महसूल विभागाच्या जमिनी महिलांकडे हस्तांतरित करताना त्यांना सवलत द्यावी, महिलांच्या उद्योगांसाठी गायरान जमिनी उपलब्ध कराव्यात आदी मागण्या मंत्री गायकवाड यांनी महसूलमंत्र्यांकडे करताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या आवश्यक आहेत, असा आग्रह धरला.
अत्याचरित महिलांचे पुनर्वसन, दारिद्रयरेषेखालील कुटुंबातील मुलींच्या नावावर २१ हजार ४०० रुपये ठेवून त्यांना १८ वर्षांनंतर १ लाख रुपये शिक्षण किंवा रोजगारासाठी उपलब्ध करण्याची‘सुकन्या योजना, बचतगटांसाठी पर्यटनस्थळी आहार पुरवण्याची योजना प्रस्तावित केल्या जाणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
महिलांनी संघटित ताकद दाखवून देऊन नगर शहरातील महापालिकेत काँग्रेसची सत्ता आणावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. प्रदेशाध्यक्ष व्यवहारे यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीस महिलांनी सक्षमपणे सामोरे जावे, असे आवाहन केले. काँग्रेसचे जनहिताचे धोरण लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नगर शहरात प्रशिक्षित महिलांचे एक पथक स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. शहर जिल्हाध्यक्ष ब्रीजलाल सारडा, संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, प्रदेश सरचिटणीस अनुराधा नागवडे, निरीक्षक अश्विनी बोरास्ते आदींची भाषणे झाली. महिला शहर जिल्हाध्यक्ष सविता मोरे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, नगराध्यक्ष राजश्री ससाणे, संपत म्हस्के, माजी आमदार शिवाजीराव नागवडे आदी उपस्थित होते. मेळाव्यास महिलांची मोठी गर्दी होती.
‘सेना शहरात सुधारणा घडवू शकणार नाही’
मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, खा. प्रिया दत्त आदी उपस्थित राहणार असल्याचे पूर्वी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात ते अनुपस्थित राहिले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरातही मेळावा संपतासंपता आले. मंत्री वर्षा गायकवाड भाषण आटोपून लगेच निघून गेल्या. थोरात यांनी शिवसेना नगर शहरात सुधारणा घडवू शकणार नसल्याने महिलांनी ताकद दाखवत शहरात परिवर्तन करावे, असे आवाहन केले.