राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. या करोनाबाधित रुग्णांमध्ये सर्वसामान्यांबरोबरच पहिल्या फळीतील योद्धे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होतो आहे. मागील ४८ तासांत राज्यात १८५ नवे करोना पॉझिटिव्ह पोलीस आढळले आहेत. तर, दोन पोलिसांना करोनामुळे जीव गमावावा लागला आहे. याचबरोबर करोाबाधित पोलिसांची एकूण संख्या आता ४ हजार २८८ वर पोहचली आहे.

राज्यात आढळलेल्या एकूण ४ हजार २८८ करोनाबाधित पोलिसांपैकी सध्या ९९८ जणांवर उपचार सुरू आहेत. तर ३ हजार २३९ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत करोनामुळे ५१ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांना दिवसेंदिवस करोनाची लागण झाल्याच्या घटना वाढत असल्याने पोलीस दलात काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे. करोना लॉकडाउनच्या काळात पोलिसांनी आपल्या जीवावर उदार होऊन, कर्तव्य बजवावे लागत आहे. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावं यासाठी त्यांना रस्त्यावर सतर्क राहावं लागत आहे. मात्र, आता त्यांना देखील करोना संसर्ग मोठ्याप्रमाणावर होत असल्याचे दिसत आहे.