करोनाच्या काळात आरोग्याला क्षती न पोहोचता सुरक्षित अंतर राखून मजुरांनी काम करण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात तेंदूपानांचे संकलन केले जाते. या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात तेंदूची झाडे आहेत.तेंदूपान संकलनाच्या माध्यमातून या वनक्षेत्रातील गोरगरीब आदिवासी व इतर मजुरांच्या हाताला काम उपलब्ध होत असून, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटतो. त्यामुळे मजुरांच्या कुटुंबांना उन्हाळ्याच्या दिवसांत या मजुरीच्या माध्यमातून एक मोठा आर्थिक आधार प्राप्त होत असतो. या काळात काही कामे सुरू झाली आहेत तर काही कामे नियोजनात असून मजुरांना  लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बल्लारशा वनपरिक्षेत्रातील गावामध्ये लॅाकडाउन काळात मजुरांना रोजगारासाठी तेदूंपान संकलन करणे वरदान ठरले असून, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन करून बल्लारशहा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या कळमना, बामणी, दहेली ,केम ,कोर्टी, लावारी ,कवडजई ,उमरी, सातारा भोसले व सातारा कोमटी या गावात तेंदूपाने संकलन सुरू करण्यात आले आहे. प्रति शेकडा तेंदूपुड्या संकलनाकरिता 220 रुपये मंजूर असून गावकरी स्वखुशीने तेंदूपाने संकलनाचे काम करीत आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 फेब्रुवारी 2020 रोजी लागू करून खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली असून त्याबाबत नियमावली तयार करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या अटी शर्ती व आदेशानुसार सर्व तेंदुपत्ता मजुरांनी नियमांचे पालन करून आपली मजुरी मिळवावी. परंतु, कायद्याचे कोणतेही उल्लंघन करू नये. आपण स्वतः सुरक्षित राहून आपल्या कुटुंबासह आपल्या गावाला व देशाला सुरक्षित ठेवण्याचे आदेश निर्गमित केले गेले आहे.

केंद्र व महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, आरोग्य विभाग तसेच वनविभाग यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. दर 20 मिनिटाला आपले हात साबणाने किंवा जंतुनाशकाने स्वच्छ धुवावे. शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल किंवा स्वच्छ कापडाचा वापर करावा. दोन व्यक्तीमध्ये कमीत कमी 2 मीटर अंतर ठेवावे. फळीवर उभे राहताना किंवा बसतांना सुरक्षित अंतर ठेवावे आणि फळीवर गर्दी करू नये.  जंगलात, फळीवर जाताना किंवा इतर ठिकाणी फिरतांना नेहमी तोंडावर रुमाल, मास्क बांधूनच जावे. एकमेकांसोबत हस्तांदोलन करणे टाळावे. वारंवार नाकाला व तोंडाला हात लावू नये, सार्वजनिक ठिकाणी, खुल्या जागेवर थुंकू नये. फळीवर आल्यावर व फळीवरुन घरी गेल्यानंतर साबणाने किंवा जंतुनाशकाने आपले हात स्वच्छ धुवावेत. आजारी व्यक्तीची माहिती किंवा आजाराबाबतची माहिती आपल्या गावातील सरपंच,पोलीस पाटील यांना त्वरित द्यावी. तेंदूपाने गोळा करण्याकरिता सूर्योदयानंतर जंगलात समूहाने जावे, एकटे जाऊ नये. जंगली प्राण्यांचे वास्तव्य असलेल्या भागात एकटे जाऊ नये. जंगलात तेंदूपाने गोळा करतांना कोणत्याही झाडाची अवैध तोड करू नये. त्यासोबतच वनविभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्लारपुर यांनी केले आहे.