वंचित आघाडीच्या फटक्याने काँग्रेसचा धुव्वा; अनेक दिग्गजांचा पराभव

उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेल्या महाराष्ट्रात ४१ जागा जिंकून भाजप आणि शिवसेनेने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. चांगल्या यशाची अपेक्षा केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागांवरच समाधान मानावे लागले, तर काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. औरंगाबादमध्ये शिवसेनेचा पराभव करून एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी धक्कादायक विजय संपादन केला. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसच्या दलित आणि मुस्लीम मतपेढीत फूट पाडण्याचे काम केले आणि ते भाजपच्या पथ्यावरच पडले.

राज्यातील ४८ पैकी ४१ जागा जिंकून भाजप-शिवसेना युतीने आपले वर्चस्व कायम राखले. गेल्या वेळी युतीचे ४२ खासदार निवडून आले होते. यंदा राजू शेट्टी हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतून लढले. भाजप आणि शिवसेनेने आपले संख्याबळ कायम राखले. मुंबईतील सहाही मतदारसंघ भाजप-शिवसेना युतीने कायम राखले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईतून पराभूत झाले. ठाण्यातील चारही मतदारसंघांमध्ये पुन्हा युतीचेच वर्चस्व कायम राहिले. कोकणातील दोनपैकी रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी गतवेळच्या निसटत्या पराभवाचे उट्टे काढले. तटकरे हे ३१ हजार मतांनी विजयी झाले. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीलेश यांचा दारुण पराभव झाला. शिवसेनेने पुन्हा एकदा राणे यांना धक्का दिला आहे.

गेल्या वेळी विदर्भातील सर्व दहाही जागा युतीने जिंकल्या होत्या; पण यंदा चंद्रपूरमध्ये काँग्रेसला विजय मिळाला. बाकी नऊ जागांवर भाजप-शिवसेना युतीने विजय मिळविला आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरी यांनी सुमारे दीड लाखांनी विजय मिळविला आहे.

गेल्या वेळी काँग्रेसने जिंकलेली हिंगोलीची जागाही गमवावी लागली. मराठवाडय़ातील आठपैकी सात जागा युतीला, तर एक जागा एमआयएमला मिळाली.

उत्तर महाराष्ट्राचा गड भाजप-शिवसेना युतीने कायम राखला. या पट्टय़ातील सर्व जागा युतीने जिंकल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात बारामती आणि साताऱ्याचा अपवाद वगळता उर्वरित १० जागा युतीने जिंकल्या आहेत. अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सूजय यांनी राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचा सुमारे दोन लाख मतांनी पराभव केला. सोलापूरमध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा लागोपाठ दुसऱ्यांदा पराभव झाला.

’राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुत्र पार्थ यांची उमेदवारी प्रतिष्ठेची केली होती. नातवाच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांना माघार घ्यावी लागली होती; परंतु मावळ मतदारसंघातून पार्थ पवार हे दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभूत झाले. पवार कुटुंबीयातील उमेदवाराचा पराभव होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.

’मराठवाडय़ात औरंगाबाद या पारंपरिक मतदारसंघात शिवसेनेचा पराभव झाला. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव करीत निसटता विजय मिळविला.

’ केंद्रीय मंत्री अनंत गीते, हंसराज अहिर, सुशीलकुमार शिंदे व अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री  आणि  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा या निवडणुकीत पराभव झाला.