नगर परिषद पोटनिवडणूक

रत्नागिरी नगर परिषदेच्या चार जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना यांच्यात तिरंगी लढतीचे चित्र पुढे आले असून त्यामध्ये शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मागील नगर परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार सदस्यांना पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरवण्यात आल्यामुळे ही पोटनिवडणूक येत्या १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामध्ये शिवसेनेतून नुकताच प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष उमेश शेटय़े, त्यांची सून कौसल्या शेटय़े, शिल्पा राहुल सुर्वे आणि रुबीना मालवणकर या चार जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काल उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच भाजपा-सेना युतीमध्ये जागांबाबत समझोता न झाल्यामुळे भाजपाकडून नीलिमा शेलार आणि सुहासिनी भोळे या दोन उमेदवारांनी काल, तर मनोज पाटणकर व निशा आलीम यांनी आज अर्ज भरले. मात्र शिवसेनेने आपल्या उमेदवारांबाबत आजच्या अखेरच्या दिवसापर्यंत गुप्तता पाळली होती. आज सेनेचे आमदार उदय सामंत, राजन साळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक इत्यादींच्या उपस्थितीत सेनेतर्फे पूजा रोहन सुर्वे, ऋतुजा देसाई, तनवीर जमादार आणि दिशा साळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याचबरोबर काही अपक्षांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे कागदोपत्री या निवडणुका बहुरंगी दिसत असल्या तरी प्रत्यक्षात त्या तिरंगी होणार असून त्यातही राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात मुख्य सामना आहे.

नगर परिषदेच्या प्रभाग २ आणि प्रभाग ४ मधील प्रत्येकी दोन जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. मागील निवडणुकीत या चारही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. पण त्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार असलेले सामंत मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. तसेच शेजारच्या राजापूर मतदारसंघातून सेनेचे राजन साळवी विजयी झाले. या दोन्ही आमदारांनी या चार जागा सेनेकडे खेचण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. दुसरीकडे सेनेतून तीन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झालेले माजी नगराध्यक्ष उमेश शेटय़े यांना आपली राजकीय क्षमता सिद्ध करण्यासाठी स्वत:सह जास्तीत जास्त जागा राखणे गरजेचे झाले आहे. सामंत यांच्या पक्षांतरानंतर शहरात राष्ट्रवादी अतिशय प्रभावहीन झाली असून २८ सदस्यांच्या नगर परिषदेत त्यांचे फक्त दोन सदस्य आहेत.

या पोटनिवडणुकीत भाजपाने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले असले तरी त्यांची निवडून येण्याची फारशी क्षमता नाही. त्यामुळे केवळ सेनेला अडचण निर्माण करून नगर परिषदेच्या वर्तुळात युती अंतर्गत राजकारणामध्ये आपला वरचष्मा राखण्यासाठी या पक्षाने उमेदवार उभे केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे युतीच्या मतांची विभागणी होण्याची आशा राष्ट्रवादीचे नेते बाळगून आहेत. पण गेल्या काही निवडणुकांमधील मतदारांची मानसिकता लक्षात घेता राष्ट्रवादी आणि सेना या दोन पक्षांच्या उमेदवारांमध्ये मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता जास्त आहे.