यवतमाळ जिल्ह्यात करोना प्रादुर्भाव झपाट्याने सुरू असून सण, उत्सवाच्या काळात नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याने धोका अधिक वाढला आहे. मागील तीन दिवसांत यवतमाळ जिल्ह्यात २१० करोना रूग्णांची भर पडली आहे.तर,आठवडाभरात सात रुग्णांचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे.

गुरूवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांमध्ये ७५ पुरूष आणि ४० महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक २३ रूग्ण हे यवतमाळ शहरातील आहेत. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या ४० जणांमध्ये २४ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे. तसेच, शुक्रवारी पुसद येथील आंबेडकर वॉर्डातील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या ६३ वर पोहचली आहे. आज (शनिवार) जिल्ह्यात नव्याने ५५ करोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. यात यवतमाळ शहरातील रूग्णांची संख्या अधिक आहे. तर तीन दिवसांत वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षासह विविध कोविड केअर सेंटरमधील १३३ रूग्णांना उपचारानंतर ते बरे झाल्यामुळे  सुट्टी देण्यात आली आहे. या आठवड्यात करोना रूग्णांच्या मृत्यूतही घट नोंदविण्यात आली आहे. सध्या ६३३ करोनाबाधितांवर वैद्यकीय महाविद्यालयासह विविध करोना केंद्रात उपचार सुरू आहेत.

‘प्लाझ्मा’ दानासाठी केवळ आठ जणांचा पुढाकार –

जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५०० पेक्षा जास्त  रूग्णांना करोनाची लागण झाली आहे. यापैकी १ हजार ६६४ रूग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले. मात्र यापैकी केवळ आठ रूग्ण रक्तघटक द्रव्य (प्लाझ्मा) दानासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे रूग्णांनी ‘प्लाझ्मा’दान करावे यासाठी जनजागृती करण्यात वैद्यकीय प्रशासन कमी पडल्याचे बोलले जात आहे.

एकीकडे कोरोना आजारावर लस अथवा प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांचे रक्त घेऊन त्याव्दारे ‘ॲन्टीबॉडीज’ (प्रतिपींड) हा प्रभावी उपचार आहे. ॲन्टीबॉडीज दिल्या गेल्याने अनेकांचे प्राण वाचण्याची दाट शक्यता आहे, असे डॉक्टरच सांगतात. त्यामुळे करोना आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांमध्ये जनजागृती करून जास्तीत जास्त रुग्णांकडून प्लाझ्मादान करून घ्यायला हवे होते. मात्र यासाठी स्थानिक प्रशासनाने फारसा पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही. प्रारंभी दोन करोनामुक्त व्यक्ती यासाठी पुढे आल्या. तेव्हा प्रशासनाने ती माहिती जाहीर केली होती. त्यानंतर मात्र फारसा प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यात तब्बल दोन हजार ५२२ रुग्ण करोना रूग्ण आढळून आले. त्यापैकी एक हजार ६६६ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन रूग्णालयातून बाहेर पडले. त्यातील केवळ आठ रुग्णांनी रक्तदान करून ‘प्लाझ्मा थेरपी’व्दारे ॲन्टीबॉडीज तयार करण्यासाठी प्रशासनाला मदत केली. मात्र रक्तदान करणाऱ्या रुग्णांचा आकडा अतिशय तोकडा आहे. प्रशासनाने करोना आजारातून बाहेर पडलेल्या रुग्णांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती केली असती, तर कदाचित हा आकडा मोठा राहिला असता. मात्र तसे न झाल्याने रक्तदानासाठी करोनामुक्त रुग्णांचे मन वळविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची चर्चा वैद्यकीय महाविद्यालयात सुरू आहे.

औषधोपचारानंतर करोना आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांपैकी केवळ आठ जणांनी प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान केले. अनेक रुग्णांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्यात आले. मात्र त्याचा उपयोग झाला नसल्याची प्रतिक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील करोना समन्वयक डॉ. मिलींद कांबळे यांनी व्यक्त केली.