यवतमाळ जिल्ह्यात ३० मे पर्यंत करोनाचा मृत्यूदर शून्य असताना गेल्या दहा दिवसांत करोना संसर्गामुळे चारजण दगावले. यातील तिघेजण यवतमाळ जिल्ह्यातील रहिवाशी असून, एकजण नाशिक जिल्ह्यातील आहे. जिल्ह्यात चारजणांचा मृत्यू झाला असला तरी प्रत्यक्षात दोघांच्याच मृत्यूची अधिकृत नोंद शासन दप्तरी झाली असल्याची बाब समोर आली आहे.
अडीच महिन्यांपूर्वी केवळ यवतमाळ शहरात धुमाकूळ घालणाऱ्या करोना संसर्गाने आता ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. सर्वाधिक २१ रूग्णांची नोंद उमरखेड तालुक्यात तर दिग्रस तालुक्यात १२, महागाव ११, पुसद ९ आणि दारव्हा, कळंब या तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. उमरखेड तालुक्यातील नागापूर येथील ४३ वर्षीय महिला करोना संसर्गाने दगावली. हा यवतमाळ जिल्ह्यातील पहिला करोनाबळी. त्या पाठोपाठ महागाव येथे एका ४० वर्षीय सराफा व्यावसायिकाचा करोना संसर्गाने मृत्यू झाला. नेर येथे कृषी साहित्य घेऊन आलेल्या नाशिकच्या ६० वर्षीय ट्रक चालकाचा वाहनातच मृत्यू झाला. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत त्याची मृत्यूपश्चात करोना चाचणी करण्यात आली. त्यात तो पॉझिटिव्ह आढळला. करोना पॉझिटिव्ह असतानाही मुंबईतील घाटकोपरच्या एका रूग्णालयातून यवतमाळला येताना दिग्रस तालुक्यातील आरंभी येथील ४३ वर्षीय व्यक्तीचा यवतमाळनजीक प्रवासादरम्यान रूग्णवाहिकेतच मृत्यू झाला. जिल्ह्यात करोना संसर्गामुळे असे चार मृत्यू आतापर्यंत झाले असले तरी शासन दप्तरी केवळ दोन मृत्यूची नोंद घेतली गेली आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांमध्येही गोंधळाची स्थिती आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांना विचारले असता, त्यांनीही वरिष्ठांच्या सूचनेनुसार यवतमाळात दोनच मृत्यूची नोंद घेतल्याची माहिती ‘लोकसत्ता’स दिली. उमरखेड आणि महागाव येथील रूग्ण हे यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान दगावले. या दोघांचाही आधारवर अधिकृत पत्ता यवतमाळ जिल्ह्यातील आहे. त्यामुळे जिल्ह्यातून या दोघांच्याच मृत्यूची नोंद भारत सरकारच्या कोवीड पोर्टलवर झाली आहे. या पोर्टलवर रूग्णाच्या आधारकार्डवरील पत्ता ज्या जिल्ह्यातील आहे, तो त्या जिल्ह्याचा रहिवाशी समजला जाऊन नोंद घेतली जाते. त्यामुळे नाशिकच्या व्यक्तीच्या मृत्यू यवतमाळात झाला तरी संकेतस्थळावर त्याची नोंद पत्ताप्रमाणे नाशिक जिल्याच्त घेतली गेली. हाच प्रकार दिग्रस तालुक्यातील आरंभी येथील मृताबाबत घडला. हा व्यक्ती गेल्या काही वर्षांपासून मुंबईत राहत असल्याने त्याची नोंद मुंबईच्या मृतांमध्ये घेतली गेली. त्यामुळे गेल्या आठवड्यात यवतमाळचे तीन आणि नाशिकचा एक असे चारजण करोनामुळे मृत्यूमुखी पडले असले, तरी अधिकृतपणे दोघांचाच मृत्यू झाल्याचे दाखविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सांगितले. देशात मृतांच्या आकड्यांमध्ये तफावत येऊ नये, यासाठी पोर्टलवर आधार कार्डवर नोंदविलेल्या पत्यानुसार नोंदी घेतल्या जातात, असे सिंह म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2020 7:13 pm