यवतमाळ जिल्ह्यात करोना संसर्ग झपाट्याने वाढत असून मंगळवारी रात्रीपासून आज बुधवारी दिवसभरात ७० पेक्षा जास्त नवे करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ६५० वर पोहचली आहे.  यवतमाळ, पांढरकवडा येथे रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने पुढील आठवड्यापासून या दोन्ही शहरांत संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याचे  प्रशासनाने ठरवले आहे.

सध्या पुसद व दिग्रस येथे आजपासून सात दिवसांसाठी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. यवतमाळसह, पुसद, पांढरकवडा, नेर, दिग्रस, कळंब, दारव्हा आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा ५४  पेक्षाअधिक व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर आज बुधवारी त्यात २५ रूग्णांची भर पडली. पुसद येथे सर्वाधिक रूग्ण आढळले तर पांढरकवडा येथे एकाच वॉर्डात १८ पेक्षा अधिक रूग्ण आढळल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान करोना संसर्गामुळे यवतमाळमधील एका व्यावसायिकाचा मृत्यू झाला. तर वणी येथील एका आजारी महिलेचा सेवाग्राम येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या  महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे मृतांची संख्या २१ वर पोहचली आहे.

वणी येथील वृद्ध महिला पोटाच्या विकाराने त्रस्त असल्याने तिला उपचारांसाठी सेवाग्रामला नेण्यात आले होते. तिथे तिची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. अखेर उपचारादरम्यान मंगळवारी तिचा मृत्यू झाला. तर यवतमाळ येथे मृत्यू झालेला मोबाईल व्यावसायिक नागपूर येथून परतला होता. दोन दिवसांपूर्वी त्याच्या घरी एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्याच्या अंत्ययात्रेतच या व्यावसायिकाला श्वसनाचा त्रासु सुरू झाला होता. त्याचा अवाहल पॉझिटिव्ह आल्यानंतर काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला. यवतमाळ शहरात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पुढील आठवड्यात शहरात पहिल्या टप्प्यात सात दिवसांसाठी संपूर्ण टाळेबंदी करण्याची योजना प्रशासनाने आखली आहे. आज पांढरकवडा येथेही रूग्णसंख्येचा उद्रेक झाल्याने येथेही टाळेबंदी होण्याची शक्यता ंप्रशासकीय सुत्रांनी व्यक्त केली.

१६ हजार ‘ॲन्टीजन टेस्ट किट’ची खरेदी
जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. करोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिकांच्या चाचण्या विषाणू संशोधन व रोगनिदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) व ‘ॲन्टीजन टेस्ट किट’ द्वारे करण्यात येत आहेत. या चाचण्यांची गती वाढविण्यासाठी जिल्ह्यातील १६ तालुक्यांसाठी प्रत्येकी एक हजार याप्रमाणे १६ हजार ‘ॲन्टीजन टेस्ट किट’ खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी एक कोटी रुपयांचा निधी तत्काळ मंजूर केला.