यवतमाळ जिल्ह्यात आणखी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात एक ५० वर्षीय पुरुष आणि एका ४० वर्षीय महिलेचा समावेश आहे. आज गुरुवारी पॉझिटिव्ह आलेले दोन्हीही व्यक्ती नेर येथील आहे. सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ३६ ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांसह ४७ जण भरती आहेत. यात ११ केसेस प्रिझमटिव्ह आहेत.

२४ तासात वैद्यकीय महाविद्यालयाला २२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी दोन पॉझिटिव्ह तर २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६२ वर गेली आहे. उपचाराअंती बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या १२४ असून जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या २४ तासांमध्ये  राज्यात ३६०७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १५२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, मागील २४ तासांमध्ये १५६१ रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ४६ हजार ७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर करोना रुग्णांची आत्तापर्यंतची एकूण संख्या ९७ हजार ६४८ झाली आहे. २४ तासांमध्ये ३६०७ रुग्ण आढळणं ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे असंही महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे.