21 September 2020

News Flash

संपूर्ण पाडय़ासाठी केवळ एकच तंबू

भूंकपप्रवण भागात प्रशासनाची अपुरी उपाययोजना

भूकंपप्रवण क्षेत्रात प्रशासनाच्या वतीने तंबू उभारण्यात आले आहेत. मात्र या तंबूंचा आकार कमी असल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली.

भूंकपप्रवण भागात प्रशासनाची अपुरी उपाययोजना

नितीन बोंबाडे, डहाणू

डहाणू आणि तलासरी भागांत सातत्याने बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे एनडीआरएफच्या तुकडीने सुरक्षेची उपाययोजना म्हणून प्रत्येक पाडय़ासाठी एक तंबू उभारला आहे. मात्र या तंबूची क्षमता खूपच कमी आहे. १२ बाय १२च्या या तंबूमध्ये ७० ते ८० जण राहू शकतात, असा दावा प्रशासनामार्फत करण्यात आला असला तरी केवळ २० जणांचीच सोय या तंबूमध्ये होऊ शकते. त्यामुळे ही उपाययोजना अपुरी असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.

डहाणू, तलासरी तालुक्यांतील काही भागांत गेल्या तीन महिन्यांपासून भूकंपाचे धक्के बसत आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्कालीन मदत दलाच्या (एनडीआरएफ) तुकडीने शनिवारी या परिसराची पाहणी केली. सुरक्षेची उपाययोजना म्हणून या भागातील प्रत्येक पाडय़ावर एक तंबू उभारण्यात आला आहे. भूकंपप्रवण क्षेत्रात निवारा शेड आणि भूकंप मापन यंत्रही बसवण्यात सुरुवात केली आहे. मात्र या उपाययोजना अपुऱ्या असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या तंबूत एका कुटुंबातील सात ते आठ सदस्यच राहू शकत असल्याची प्रतिक्रिया धुंदलवाडी ग्रामस्थांनी दिली आहे.

‘नागरिकांनी सहकार्य करावे’

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी या भूकंपप्रवण भागातील नागरिकांनी भूकंपामुळे घाबरून जाऊ नये. प्रशासन आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर असून आपत्कालीन स्थितीत प्रशासनास योग्य सहकार्य करावे, असे आवाहन आदिवासी विकासमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी सोमवारी केले. नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये. या परिस्थितीत प्रशासन अत्यंत चांगले काम करत आहे. शासनाने भूकंपसंदर्भात गंभीर दखल घेतली असून सावधानतेबाबत काळजी घेण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहे, असे सवरा म्हणाले.

जिल्ह्य़ातील महत्त्वाचे प्रकल्प सुरक्षित

डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही भागांत गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत असले तरी जिल्ह्य़ातील महत्त्वाच्या प्रकल्पांना भूकंपाचा धोका नाही, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्य़ातील कुझ्रे धरण, तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प, रिलायन्सचा प्रकल्प हे प्रकल्प सुरक्षित आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. संबंधित अभियंत्यांनी कुर्झे धरणाची आणि जेथून पाणी सोडले जाते, त्या टो लाइनची प्राथमिक पाहणी केली असून तिथे सध्या तरी कोणताही धोका नाही. येथे तीन पाळ्यांमध्ये संबंधित कर्मचारी उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. नाशिक येथील धरण सुरक्षा मंडळाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाला सविस्तर पाहणीसाठी बोलावण्यात आले आहे. रिलायन्सच्या प्रकल्पाचे डिझाइनही भूकंपरोधक बनवलेले असल्याने या भूकंपाचा त्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाची रचनाही भूकंपरोधक असल्याने त्यांनाही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले.

पीडित कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत

भूकंपाच्या धक्क्याने शुक्रवारी हळद पाडा-खिवरपाडा येथील वैभवी भूयाल ही दोन वर्षांची मुलगी घाबरून घराबाहेर पडत असताना दगडावर डोके आपटून तिचा मृत्यू झाला. मात्र तिच्या मृत्यूनंतर एकही शासकीय अधिकारी पीडित कुटुंबाच्या घरी फिरकला नसल्याची खंत वैभवीच्या वडिलांनी व्यक्त केली. रोजगारासाठी खारघर येथे हे कुटुंब स्थलांतरित झाले होते. शिधावाटप दुकानात आधारकाडे नोंदणी करण्यासाठी ते गावी आले होते. मात्र भूकंपाच्या धक्क्याने वैभवीचा बळी गेला. वैभवीच्या कुटुंबाला लोकप्रतिनिधींनी किरकोळ मदत केली असली तरी शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दापचरी पाडय़ावर बांबू उभारण्यात आले आहेत. या पाडय़ावर ५० घरे आहेत, मात्र तंबूमध्ये फक्त १० ते २० जण राहू शकतात. अन्य रहिवाशांनी जायचे कुठे?

-विक्या बेंडगा, रहिवासी, दापचरी.

पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली आहे. लवकरच या कुटुंबाला शासकीय मदत पोहोचवली जाईल. त्यासाठी मी प्रयत्नशील आहे.

-राजेंद्र गावित, खासदार.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 12:52 am

Web Title: inadequate measures from administration in earthquake areas of dahanu and talasari tehsils
Next Stories
1 भूकंपाच्या भीतीने शाळा ओस
2 ‘ठोस पावलं उचलणार असाल तरच या, नुसती आश्वासनं नको’; अण्णा उपोषणावर ठाम
3 परदेशी चलन देण्याचे आमिष दाखवणाऱ्या केनियन भामट्यास कोल्हापुरात अटक
Just Now!
X