महाराष्ट्र पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या सुसज्ज अशा ‘सप्तश्रृंगी संकुल’ नामक गृह प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. १६८ घरांच्या या गृहसंकुलात दीड हजार लोकांची बसण्याची व्यवस्था होईल, अशा ओपन थिएटरसह अनेक सुविधांचा समावेश आहे.

नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत शुक्रवारी (दि.५) पोलीस उपनिरिक्षकांची ११५वा दीक्षांत समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजन, रणजीत पाटील, दीपक केसरकर या मंत्र्यांसह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलीस संकुलाची पाहणी केली.

यावेळी संपूर्ण प्रशिक्षणादरम्यान, उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विविध जिल्ह्यातील उमेदवारांना विविध मेडल्सने गौरवण्यात आले. यामध्ये राजेश जावरे (बुलडाणा), मारुती जगझापे (सोलापूर), किरण पाटील (धुळे), कुणाल चव्हाण (नाशिक), नागेश येनपे (सोलापूर), लक्ष्मी सपकाळे (जळगाव), मंगेश बाचकर (अहमदनगर), प्रकाश कदम (कोल्हापूर) यांचा समावेश आहे.

यावेळी नव्या पोलीस उपनिरिक्षकांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखताना आपल्याला संवेदनशीलता कायम ठेवता आली पाहिजे. त्याशिवाय आपण आपले कर्तव्य पूर्णपणे पार पडू शकत नाही. आपला विकास हा केवळ बढतीनेच नव्हे तर अनुभवाने व्हायला हवा. तसेच आपल्या आनंदाच्या आणि रागाच्या काळातही शिस्त राखली गेलीच पाहिजे. हे करताना परिणामकारकता आणि संयम यांच्यात समन्वय साधता यायला हवा.

महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील एक उत्कृष्ट पोलीस दल आहे. आपले पोलीस हे गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देणारे म्हणूनच नव्हे तर माणुसकी असलेले पोलीस म्हणूनही ओळखले जातात. जनतेची सेवा हेच आपले कर्तव्य असून त्यांची सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य असायला हवे. कठीण परिस्थितीही व्यवस्थित हाताळण्याच्या क्षमतेवरुन एखाद्या पोलिसाचे व्यावसायीक कौशल्य ओळखता येते, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नव्या पोलीस अधिकाऱ्यांना प्रेरित केले.