खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची मालमत्ता वर्षांला कोटींची उड्डाणे घेत असल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात आयकर विभागाकडे १० ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न दाखवून कर बुडवला जात आहे. या पाश्र्वभूमीवर औरंगाबाद येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस तळ ठोकून शहरातील नामांकित रुग्णालयातील डॉक्टरांच्या मालमत्तेची तपासणी केली. मालमत्ता लपवणाऱ्या, वेळेवर कर न भरणाऱ्या डॉक्टरांना तंबी देत त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात दंडासह कर वसूल करण्यात आला. मात्र, ही गोपनीय बाब असल्याने अधिकृत माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.
शहरात मागील १० वर्षांत मोठय़ा प्रमाणात खासगी वैद्यकीय व्यवसाय भरभराटीस आला. पाच ते दहा उच्चशिक्षित वैद्यकीय डॉक्टर एकत्र येऊन रुग्णालय सुरू करतात. या रुग्णालयातील उपचार अत्यंत महागडे असून उपचाराबाबत कोणतेही दर, नियम आणि या व्यवसायावर सरकारचेही नियंत्रण नसल्याने डॉक्टरांची मनमानी रुग्णांनाही अंगवळणी पडली आहे. वैद्यकीय पदवी घेऊन खासगी व्यवसाय सुरू करणाऱ्या डॉक्टरांची सांपत्तिक स्थिती अवघ्या काही वर्षांत कोटींची उड्डाणे घेते.
शहरात मोक्याच्या जागा खरेदी करण्याची आíथक क्षमता केवळ डॉक्टरांमध्येच असल्याचेही दिसून येते. या पाश्र्वभूमीवर हे डॉक्टर आयकर विभागाकडे वर्षांला १०-१५ लाखांचे उत्पन्न दाखवून सेवा कर भरून मोकळे होतात.
 आयकर विभागही डॉक्टरांच्या भानगडीत फारसा पडत नाही, परंतु केंद्र सरकारने स्वच्छ भारतअंतर्गत २ टक्के सेवाकर अधिकचा आकारणे सुरू केल्यानंतर आयकर विभागाच्या रडारवर आता व्यापाऱ्यांबरोबरच खासगी वैद्यकीय व्यावसायिकही आले आहेत.
औरंगाबाद विभागाच्या आयकर अधिकाऱ्यांनी दोन दिवस बीडमध्ये तळ ठोकून शहरातील नामांकित रुग्णालयातील ७-८ डॉक्टरांच्या संपत्तीची अचानक तपासणी केली. गेवराईतही दोन डॉक्टरांना तपासणीस सामोरे जावे लागले. वेळेवर कर न भरणाऱ्या आणि उत्पन्न कमी दाखवणाऱ्या डॉक्टरांना तंबी देत त्यांच्याकडून दंडासह लाखो रुपयांचा कर भरून घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, ही गोपनीय बाब असल्याचे सांगत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती देण्याचे टाळले.