आयकर विभागाने गुरूवारी दुपारी शहरातील आठ ठिकाणी टाकलेल्या धाडीत आता आश्चर्यकारक माहिती समोर येऊ लागली आहे. आठपैकी चार ठिकाणची छाननी पूर्ण झाली असून उर्वरित चार जणांची रात्री उशिरापर्यंत कसून तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत झालेल्या छाननीत सुमारे दहा कोटी रूपयाचे उत्पन्न दडविले असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंतिम आकडा उर्वरित चार जणांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर चव्हाट्यावर येणार आहे.

उत्पन्न दडवून करचोरी करणार्‍या आठ जणांवर औरंगाबाद आणि लातूर येथील आयकर विभागाच्या ४० अधिकारी कर्मचार्‍यांच्या पथकाने गुरूवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक धाडसत्र सुरू केले. यात दोन ठेकेदार, पाच डॉक्टर आणि एक डायग्नोस्टिक सेंटर असल्यामुळे ही वार्ता जिल्हाभरात वार्‍यासारखी पसरली. आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त संदीपकुमार साळुंखे आणि उपायुक्त उदलराज सिंग यांनी रात्री उशिरापर्यंत आठही ठिकाणची कागदपत्रे जप्त करून कसून तपासणी केली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत आठपैकी चार ठिकाणची छाननी जवळपास पूर्ण झाली असल्याची माहिती उदलराज सिंग यांनी दिली. यात अंदाजे दहा कोटीपेक्षा अधिक उत्पन्न दडवले असल्याची प्राथमिक माहिती कागदपत्रांच्या तपासणीतून समोर आली असल्याचे त्यांनी सांगितले. आठ जणांपैकी प्रथितयश सरकारमान्य बांधकाम ठेकेदार मात्र आयकर विभागाच्या कचाट्यात चांगलाच सापडला आहे. आजवर या ठेकेदाराने एकदाही आयकर परतावा दाखल केलेला नाही. त्याच्या संस्थेमधून सापडलेल्या कागदपत्रांवरून मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा ठेकेदार चांगलाच गोत्यात अडकला आहे.

प्रत्यक्ष उत्पन्न आणि कागदपत्रांमध्ये तफावत

औरंगाबाद आणि लातूर येथील आयकर विभागातील ४० अधिकारी आणि कर्मचार्‍यांसह २० पोलीस कर्मचार्‍यांच्या पथकाने आठही ठिकाणी एकाचवेळी छापा टाकल्यानंतर आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी तेथील कागदपत्रांचा ताबा घेतला. कागदपत्रांची प्रत्यक्ष तपासणी सुरू केल्यानंतर आयकर विभागाकडे दाखविण्यात आलेले उत्पन्न आणि प्रत्यक्षात दडवून ठेवलेले उत्पन्न यात मोठी तफावत निदर्शनास आल्याचे चौकशीत समोर आले आहे. या धाडसत्रामुळे करबुडव्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.