जालना शहरातील १० उद्योजकांवर प्राप्तिकर खात्याच्या पथकाने गुरुवारी छापे टाकले. दिवसभर ही कारवाई सुरू होती. प्राप्तिकर खात्याच्या औरंगाबाद व नाशिक कार्यालयांतील १०० हून अधिक कर्मचारी २५ गाडय़ांमधून हे छापे टाकण्यासाठी जालना शहरात दाखल झाले. विशेषत: स्टील उद्योगाशी संबंधित व्यापाऱ्यांवर हे छापे टाकण्यात आले. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर नक्की काय हाती लागले, याचा तपशील मिळू शकला नाही. मात्र, १० उद्योगांवर छापे टाकल्याच्या वृत्तास प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.
जालना शहरात मोठय़ा प्रमाणात स्टील उद्योग आहे. विक्रीकर विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी उत्पादन कमी दाखवून आयकरातून सवलत मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उद्योजकांची यादी तयार केली होती. बनावट देयकांच्या आधारे होणाऱ्या हवाला व्यवहाराला थांबविण्याचा प्रयत्न केला होता. वेगवेगळ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे १० उद्योजकांवर छापे टाकण्यात आले. मोंढय़ातील मोठा लौकिक असणाऱ्या दोन उद्योगसमूहांवर छापे टाकण्यात आले. अन्य काही उद्योजकांच्या निवासस्थानीही छापे टाकण्यात आले. या कारवाईची शहरात दिवसभर चर्चा होती. प्राप्तिकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ जालनाच नव्हे, तर अन्यत्रही छापे टाकण्याची कारवाई सुरू असल्याचे सांगितले. मात्र, अधिक तपशील देता येणार नाही, असे सांगितले.