चंद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवारावरही कारवाई
मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाचे छापे पडल्याने विरोधकांनी भाजप सरकारवर राजकीय षडयंत्राचा आरोप केला आहे.
एका महिन्यात विरोधी पक्षांच्या १० नेत्यांवर छापे टाकण्यात आले असून, चंद्रपूरमधील काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकरांवर बुधवारी छापे पडले.
गेल्या महिन्याभरात विरोधी पक्षांचे जवळपास १० नेते, त्यांचे निकटवर्तीय तर सहा महिन्यांत १५ नेते किंवा त्यांच्या निकटवर्तीयांवर छापे पडले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सहकारी, विशेष कार्यकारी अधिकारी यांच्यावर अलिकडेच प्राप्तीकर विभागाचे छापे पडले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे निकटवर्तीय व लघु पाटबंधारे मंत्री पुट्टाराजू यांच्यावरही कारवाई झाली होती. या मंत्र्यांकडे कुमारस्वामी यांच्या पुत्राच्या निवडणुकीची जबाबदारी आहे. कुमारस्वामी यांचे बंधू व बांधकाममंत्री रेवण्णा यांच्या दोन सहकाऱ्यांवरही छापे पडले होते. आंध्र प्रदेशात तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष आणि तेलुगू देशमचे उमेदवार पुट्टा सुधाकर यादव, तेलुगू देशम नेते सी. एम. रमेश, तामिळनाडूत द्रमुकचे खजिनदार आमदार दुराई मुरुगन यांच्याकडून चालविल्या जाणाऱ्या संस्था, आपचे नेते कल्याण गेहलोत आणि नरेश बलियान, मायावती यांचे निकटवर्तीय आणि निवृत्त सनदी अधिकारी नेटराम यांच्यावरही अशी कारवाई झाली. उत्तराखंडमधील भाजपशी निकटच्या एकावर छापे टाकण्यात आले होते. मात्र, भाजपने या कार्यकर्त्यांशी काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करीत हात झटकले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 11, 2019 1:44 am