दुष्काळ आणि आर्थिक मंदी या कारणांमुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबले होते, मात्र खरेदी-विक्री व्यवहारातून मुद्रांक शुल्कापोटी वर्षभरात तब्बल ८ कोटी जास्तीचा महसूल जमा झाला. या वर्षी ७० कोटी रुपये सरकारी खात्यात या व्यवहारातून जमा झाले.
सह जिल्हा निबंधक एन. बी. विभुते यांनी ही माहिती दिली. बीड हा प्रामुख्याने दुष्काळी व अविकसित जिल्हा म्हणून ओळखला जात असला, तरी मागील काही वर्षांत जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार चांगलेच तेजीत आले होते, मात्र अचानक जमिनीचे भाव वाढल्यामुळे काही वर्षांत हे व्यवहार मंदावले. मागील चार वर्षांच्या तुलनेत या वर्षी चांगली मुद्रांक विक्री झाली. दरवर्षी सरकारकडून कार्यालयाला महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले जाते. या वर्षीचे उद्दिष्ट ८७ कोटी रुपये असले, तरी ७० कोटींपर्यंत पूर्ण करण्यात आले आहेत.