‘ती’च्या जन्मावरून मराठवाडय़ात मोठा गहजब झाला होता. विशेषत: बीडमध्ये मुंडे दाम्पत्यांनी घातलेले घोळ लक्षात आल्यानंतर मुलींचा जन्मदर वाढावा, या साठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या. सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. हिंगोली जिल्ह्य़ात १ हजार मुलांमागे ९३८ मुली जन्माला येत असल्याचे दिसून आले. पूर्वी हे प्रमाण केवळ ८६८ होते. सरासरी ७०ने झालेली ही वाढ लक्षणीय मानली जाते. आरोग्य विभागातील मंडळी तर या मुलींच्या जन्मदराचा चढता आलेख पाहून खूश होत आहेत.
गर्भलिंग निदान चाचण्यांचा गैरवापर करून स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण एवढे अधिक होते की, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस, महसूल व जिल्हा शल्यचिकित्सकांसह सामाजिक संस्थांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागल्या. गर्भलिंग निदान विरोधी कायद्यान्वये ११ प्रकरणे न्यायालयात दाखल झाली. त्यात दोन प्रकरणांतील आरोपी निर्दोष मुक्त झाले. अन्य ९ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. जिल्ह्य़ात २५ सोनोग्राफी सेंटर असून त्यातील ७ सोनोग्राफी केंद्रांना सील ठोकण्यात आले. सध्या ११ सोनोग्राफी सेंटरमध्ये तपासणी केली जाते. ती योग्य आहेत की नाही, यावर नियंत्रण ठेवले जाते. सील केलेल्या सोनोग्राफी सेंटरमध्ये व्यंकटेश हॉस्टिपटल, माधव मेमोरियल, वामनराव देशमुख, वसमत येथील गायत्री हॉस्पिटल, आखाडा बाळापूर येथील बोंढारे हॉस्पिटल, वारंगा फाटा येथे देवशाली हॉस्पिटल यांचा समावेश आहे. केलेल्या ठोस कारवाईमुळे गर्भलिंग निदान चाचण्या कमी झाल्या. मुलींच्या जन्मदरात वाढ झाल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हेमंत बोरसे यांनी केला.