सोलापूर जिल्ह्य़ात गेल्या २६ फेब्रुवारीपासून पाच ते सहावेळा गारपीट व वादळी वाऱ्यांसह पडलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानीचा आकडा वाढत असून आतापर्यंत ५९० गावे या आपत्तीत सापडली आहेत. यात तब्बल ८७ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाले असून अद्याप नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरूच आहेत. तसेच सात जणांचा मृत्यू झाला तर जखमींची संख्याही वाढली आहे. सलग दोन वर्षे दुष्काळ सोसल्यानंतर आता गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यामुळे शेतकरी पूर्णत: खचून गेला आहे.
गेल्या शनिवारी व काल रविवारी वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपिटीचे थैमान होऊन त्यात चार जणांचा बळी गेला. यात पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथे घराची भिंत कोसळून लिंगदेव रघुनाथ गावडे (५५) यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी लतिका (४५) व मुलगा महावीर हे दोघे जखमी झाले. पुळूज या गावात एकाचवेळी २४ घरे कोसळली. खेडभाळवणी येथे नवनाथ विष्णू पवार हे घर अंगावर कोसळल्याने जखमी झाले. अकलूज येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यातील रखवालदार सोमनाथ भिवाजी भाकरे (३५, रा. पिसेवाडी, ता. माळशिरस) यांच्या अंगावर झाड कोसळल्याने ते गंभीर जखमी होऊन मरण पावले, तर त्यांचे सहकारी अरूण भानुदास पुले (४०) हे जखमी झाले. मोहोळ तालुक्यातील औंढी येथे लोकनेते विद्यालयाचे पन्हाळी पत्रे उडून अंगावर पडल्याने त्यात धन्यकुमार रणदिवे यांचा मृत्यू झाला होता. पुन्हा याच गावात यमुना वामन गोरे (६०) ही महिला घराचे पत्रे व खांब मुळासकट उपटून अंगावर कोसळल्याने मरण पावली. तर छाया नारायण पडवळकर (४०), पांडुरंग पडवळकर (२८) व महेश दिलीप भोसे (२४) हे तिघे जखमी झाले. बार्शी तालुक्यातील राळेरास येथे वादळात अंगावर झाड कोसळल्याने सुखदेव ज्ञानदेव राऊत यांचा मृत्यू झाला. तडवळे, दहिटणे, ढोराळे, लाडोळे आदी गावांना अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यांचा तडाखा बसला.
जिल्ह्य़ात गेल्या २६ फेब्रुवारीनंतर पाच ते सहावेळा प्रचंड प्रमाणात गारपीट होऊन वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडला. यात माढा तालुक्यात सर्वाधिक ५७७.०८ मिलिमीटरप्रमाणे ६४.१२ इतका सरासरी पाऊस झाला. अक्कलकोट  तालुक्यात ५४० मिमी (सरासरी ६०), तर बार्शीत ५०३ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत तब्बल ३४८०.१७ मिमी प्रमाणे ३८.२४ मिमी एवढा सरासरी पाऊस पडला आहे. काल रविवारी रात्री अवकाळी पावसाने आपले अस्तित्व पुन्हा दाखविले. परंतु त्यात सुदैवाने जोर नव्हता. तथापि, माढा येथे २६.४९, बार्शीत १०.७०, मोहोळमध्ये ११.५८ व करमाळ्यात ११.७५ असा पाऊस झाला. तर उत्तर सोलापूर-७.९६, दक्षिण सोलापूर-५.७६, पंढरपूर-९.५४, मंगळवेढा-३.१७ याप्रमाणे कमी जास्त अवकाळी पाऊस पडला.