News Flash

‘ड्रॅगन फ्रुट’च्या लागवड क्षेत्रात वाढ

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा

अशोक तुपे, लोकसत्ता

श्रीरामपूर : मळलेली वाट सोडून शेतकरी नेहमी शेतात नवनवीन प्रयोग करतो. जे विकते, जास्त पैसे देते, ते तो पिकवतो. भौगोलिक परिस्थिती व वातावरण यावर मात करत तो त्यात यशस्वी होतो. विदेशातील ड्रॅगन फ्रुट या फळांबाबतही असेच घडले. या आरोग्यदायी फळाच्या लागवडीखाली  राज्यातील मोठे क्षेत्र आले आहे. त्याची दखल घेत आता राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ड्रॅगन फ्रुट या फळांवर संशोधन सुरू केले आहे.

ड्रॅगन फ्रुट हे मुळात आरोग्यदायी असलेले फळ, त्यात प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. ते शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित तर ठेवतेच तसेच रोगप्रतिकारकशक्ती वाढविते. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत करते. पांढऱ्या पेशी हे फळ खाल्ल्याने वाढतात, असाही एक समज आहे. विषमज्वर, डेंगू, कावीळ असे आजार झालेल्या रुग्णांना हे फळ खायला देतात. आता तर करोना झालेल्या रुग्णांना तर डॉक्टरच शिफारस करतात. त्यामुळे एक मोठी बाजारपेठ या फळाला आहे. बाजारात किंमतही खूप चांगली मिळते.

देशात अशा या गुणकारी फळाची आवक तैवान आणि व्हिएतनाममधून होते. किलोच्या दराने आणलेली ही फळे नगावर विकली जातात. मूळ मेक्सिकोतील असलेल्या या फळापिकाची लागवड कंबोडिया, थायलंड, तैवान, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, फिलिपिन्स, इंडोनेशिया आदी देशांत होते. तेथे ते यशस्वीरीत्या व्यापारी पीक म्हणून घेतले जाते. आता ते भारतातही येऊन पोचले आहे. देशात तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आदी राज्यांत मोठय़ा प्रमाणावर ड्रॅगन फ्रुटची लागवड झाली आहे. तमिळनाडू कृषी विद्यापीठाने त्यावर संशोधन केले.

गुजरातमधील जुनागड व कच्छमध्ये मोठय़ा प्रमाणावर लागवड झाल्याने आनंद कृषी विद्यापीठातही त्यावर आता संशोधन सुरू आहे. राज्यभर दुष्काळी भागात ड्रॅगन फ्रुटची लागवड वाढली आहे. त्यामुळे आता राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात त्यावर संशोधन सुरू झाले आहे. बारामती येथील जैविक व अजैविक तानावर काम करणाऱ्या नियाम या राष्ट्रीय संशोधन संस्थेतही त्यावर संशोधन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या शेतात जागा घेतलेल्या विदेशी फळांवर संशोधन करण्याची वेळ संशोधन संस्थावर आली आहे.

ड्रॅगन फ्रुटच्या जातींमध्ये विविधता आढळते. वरून लाल रंग आतील गर पांढरा, वरून लाल रंग, आतील गर लाल व वरून रंग पिवळा व आतील गर पांढरा अशा तीन प्रकारांत हे फळ येते, पण वरूनही लाल रंग व आतील गरही लाल या फळाला मागणी जास्त आहे. किंमतही जास्त मिळते.

ड्रॅगन फ्रुटला काही ठिकाणी ठिबकवर काही शेतकरी पाणी देतात, तर काही ठिकाणी पाणी दिले जात नाही. कुठे लाकडी खांबाचा, तर कुठे सिमेंटचा आधार देतात. खते, औषधे, मशागत जो तो आपल्या पद्धतीने देतो; पण आता कृषी विद्यापीठात संशोधन झाल्यानंतर ड्रॅगन फ्रुटची शेती कशी शास्त्रशुद्ध पद्धतीने करायची यांचे धडे दिले जाणार आहे.

फायदे काय?

’या फळात ९० टक्के पाणी आणि भरपूर प्रमाणात क जीवनसत्त्व असते.

’कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि बी जीवनसत्त्वामुळे गुणकारी

’सौंदर्यवर्धक, क जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

’केस गळण्यास प्रतिबंध करते. चेहऱ्यावरील डाग, उन्हाने काळवंडलेली त्वचा इत्यादीवर उपयुक्त, चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करते.

’कोलेस्टेरॉल कमी करते. बीटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, हृदयविकारात गुणकारी.

’तंतुमय असल्याने पोट साफ राहते, कॅल्शियममुळे संधिवाताच्या वेदना कमी होतात. दात, हाडे  मजबूत होतात.

’हे फळ कर्करोगाला अटकाव करते. लठ्ठपणा आणि चरबी कमी करण्या मदत करते. मधुमेह नियंत्रित करते.

राज्यात अनेक शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुटची लागवड

सुरू केली आहे. त्यासाठी त्यांना मार्गदर्शन हवे असते. आता अनेक परदेशी फळे आणि भाजीपाला आणून शेतकरी लागवड करीत आहेत. त्यामुळे त्यावर संशोधन करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.  – डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 1:51 am

Web Title: increase in cultivation area of dragon fruit zws 70
Next Stories
1 ‘पुणे पदवीधर’मध्ये चुरस सांगलीकरांतच!
2 बीटी बियाणे लागवड करूनही कापसावर बोंडअळी
3 रायगडमध्ये लवकरच चक्रीवादळ निवारा केंद्रे; राज्य सरकारचा प्रस्ताव
Just Now!
X