जव्हार, वाडा तालुक्यातील सरासरी लक्षणीय

पालघर : लांबलेला मान्सून नंतर वादळी वातावरणामुळे झालेला पाऊस यामुळे जिल्ह्यातील सरासरी भूजल स्तरांमध्ये वाढ झाली आहे. किनारपट्टीच्या तालुक्यात ही वाढ तुरळक प्रमाणात झाली असली तरी जव्हार व वाडा तालुक्यातील सरासरी भूजल पातळीत वाढ लक्षणीय आहे. असे असताना जिल्ह्यात निरीक्षण करण्यात येणाऱ्या ५४ नमुना विहिरीपैकी ११ ठिकाणी भूजल स्तर खालावल्याचे दिसून आले आहे.

पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील ५४ निरीक्षण विहिरींमधील पाण्याच्या पातळीच्या नोंदी ठरावीक कालांतराने केल्या जात असतात. जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या या विहिरींची पातळी संकलित करण्यात आल्या असून जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पाण्याच्या पातळीमध्ये काही प्रमाणात तुलनात्मक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा नोंदल्या गेलेल्या दुप्पट पावसाचा परिणाम भूजलस्तरावर झाल्याचे दिसून येत आहे.

गेल्या पाच वर्षांत भूजल स्तराशी जानेवारीत घेण्यात आलेल्या पाण्याच्या पातळीचा तुलनात्मक अभ्यास केला असता जव्हार तालुक्यातील विहिरीमधील पाण्याचा स्थर सुमारे एक मीटरने उंचावला आहे. त्याचप्रमाणे वाडा तालुक्यातील सरासरी पाण्याचा स्तर ७६ सेंटीमीटरने उंचावल्याचे दिसून आले आहे. असे असताना डहाणू, मोखाडा, पालघर, तलासरी, वसई व विक्रमगड येथील निरीक्षण विहिरींच्या स्तरांमध्ये मर्यादित प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

डहाणू तालुक्यातील कलमदेवी, जव्हार तालुक्यातील कोगडे आणि तलासरीमल, मोखाडा तालुक्यातील डोलारे, पालघर तालुक्यातील दहिसर आणि लालठाणे, तलासरी शहर, वाडा तालुक्यातील देवळी, कुडूस. पाली आणि परळी, तर वसई तालुक्यातील मांडवी आणि पेल्हार येथील भूजल स्तरांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर डहाणू तालुक्यातील घोळ, जव्हार शहर, मोखाडा तालुक्यातील मोरांडा, पालघर तालुक्यातील दुर्वेस, गोवाडे व सातिवली, तलासरी तालुक्यांतील काजळी, वेवजी व झारी, वसई तालुक्यातील तिल्हर तर विक्रमगड तालुक्यातील कासा बुद्रुक येथील निरीक्षण विहिरींमधील पाण्याची पातळी खालावल्याचे दिसून आले आहे.

 

पावसाचे पाणी साठवण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहे. यंदाच्या मोसमात चांगला पाऊस झाला तसे धरणे व नदीमधील पाण्याचा साठा चांगला असल्याने तसेच शेती बागायतीसाठी पाण्याचा उपसा मर्यादित राहिल्याने पालघर जिल्ह्यात भूजल स्तर उंचावला आहे. आगामी काळ पाण्याची अधिक प्रमाणामध्ये साठवणूक करणे शक्य आहे.

-एम. एस शेख, वरिष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा ठाणे-पालघर.