रवींद्र जुनारकर

जिल्ह्यात टाळेबंदीच्या काळात मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. गेल्या १४ महिन्यांत जंगलावर उपजीविका असलेल्या ग्रामीण भागातील ४० ग्रामस्थांचा वाघ व बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. व्याघ्र हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले हे सर्व ग्रामस्थ मोहफूल, तेंदूपत्ता, टेंभरे, बांबू तथा झाडूसाठी लागणारे गवत आणण्यासाठी जंगलात गेले होते. व्याघ्र हल्ल्यात या ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याचे दिसत असले तरी करोना उद्रेकात अर्थकारण बिघडल्याने बेरोजगारीचा सामना करणारे हे सर्व जण जंगलाच्या दिशेने गेले आणि तिथेच त्यांचा शेवट झाला हे खरे वास्तव आहे.

औद्योगिक तथा धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेला चंद्रपूर जिल्हा ताडोबा व्याघ्र प्रकल्प, घनदाट जंगल, तेथे वास्तव्याला असलेले वाघ, बिबट, अस्वल, हरीण, रानगवा, चितळ, मोर, हत्ती तथा इतर वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे. एकूण क्षेत्रफळाच्या ५० टक्के जंगल असलेल्या या जिल्ह्यातील ७५० ते ८००  गावे जंगलाला लागून आहेत. या सर्व गावांचे अर्थकारण जंगलातील वनउपजावर आधारित आहे. धानाची शेती करायची, एकदा भात पीक झाले की मग जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापासून जंगलात तेंदूपत्ता, मोहफुले, बांबू, टेंभरे किंवा झाडूसाठी लागणारे गवत वेचायला जायचे. मात्र टाळेबंदीमुळे वनउपजावर आधारित अर्थकारण बिघडले. ग्रामस्थांच्या हाताला रोजगार नसल्यामुळे ते भल्या सकाळी तेंदूपत्ता, गवत, बांबू व मोहफूल वेचण्यासाठी जंगलात जातात. नेमके त्याच वेळी वाघ व इतर वन्यप्राणी हल्ला करतात. जिल्ह्यात मागील दहा वर्षांचा विचार केला तर दरवर्षी सरासरी २० ते २५ लोकांचा व्याघ्र हल्ल्यात मृत्यू होतो. मात्र करोना संकटात गेल्या चौदा महिन्यात जवळपास ४० ग्रामस्थांचा यात मृत्यू झाला आहे. २०२०-२१ या वर्षात मागील दहा वर्षातील आजपर्यंत सर्वाधिक ३० ग्रामस्थांचा अशा हल्ल्यात मृत्यू झाला. या वर्षी म्हणजे फेब्रुवारी, मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत १० ग्रामस्थांचा बळी गेला आहे. विशेष म्हणजे, हे मृत्यू जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून तर मे या कालावधीत होतात. एकदा पावसाळ्याला सुरुवात झाली की, मग वन्यप्राणी घनदाट जंगलात असतात. एप्रिल व मे महिन्यात सर्वाधिक मृत्यू होण्याचे कारण म्हणजे ग्रामस्थ जंगलात वनउपज गोळा करण्यासाठी जातात, दुसरे याच काळात तीव्र उन्हाळ्यामुळे जंगलातील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठे पूर्णत: कोरडे पडतात व प्राणी पाण्याच्या शोधात  गावात प्रवेश करतात. रात्री, बेरात्री गावात वाघ, बिबट्याने प्रवेश केल्यानंतर मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र होतो. असा प्रकार आजवर घडत आलेला आहे. मात्र आता करोना संकटात प्रथमच  बेरोजगारीमुळे वनउपज गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्यांचा मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

मोहफुलाच्या दारूविक्रीत वाढ

संपूर्ण दारूबंदी असलेल्या या जिल्ह्यात अवैध दारू तस्करी मोठ्या प्रमाणात होते. त्यात मोहफुलाच्या दारूची भर पडली आहे. त्यामुळेच जंगलाला लागून असलेल्या गावातील ग्रामस्थ सकाळीच मोहफुले वेचण्यासाठी जातात. बहुसंख्य बेरोजगार या व्यवसायाकडे वळले आहेत. मोहफुलाची दारूविक्री चार ते पाच पट वाढल्याने अधिकाधिक मोहफुले वेचण्याच्या मोहात ग्रामस्थ वाघाच्या सापळ्यात अडकतात आणि तिथेच त्यांचा बळी जातो.

वाघिणीचा बळी

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये मागील वर्षी मोहफुलाच्या दारूची भट्टी चालवणाऱ्यांनी एक वाघीण व तिच्या दोन बछड्यांची शिकार केली होती. जिथे मोहफुलापासून तयार होणाऱ्या दारूचा कारखाना होता तिथे वाघीण व तिच्या दोन बछड्यांचे वास्तव्य होते. वाघीण व तिचे बछडे अवैध दारूविक्रीत अडथळा ठरत असल्याचे बघून या अवैध दारूविक्रेत्याने वाघीण व बछड्यांची शिकार केली होती.

मिरची तोड मजूर बेरोजगार

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दीड लाख मजूर दरवर्षी मिरची तोडण्यासाठी लगतच्या आंध्रप्रदेश व तेलंगणा या दोन राज्यात जातात. करोना संसर्गामुळे या वर्षी बहुसंख्य मजूर मिरची तोडण्यासाठी गेलेच नाहीत.  रोजगाराच्या शोधात असलेले हे मजूर दररोज जंगलात तेंदूपत्ता, मोहफुले, टेंभरे, बांबू व झाडूचे गवत वेचण्यासाठी जातात. या लोकांचा सातत्याने जंगलात वावर वाढल्याने मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे.

३०० वाघांचे वास्तव्य

चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलात आजच्या घडीला वाघांची संख्या ३०० च्या घरात आहे. ताडोबा, ताडोबा बफर, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, मध्यचांदा वन विभाग, कन्हाळगाव अभयारण्य अंतर्गत वाघ आहेत. जंगलाचे क्षेत्रफळ वाढले तसेच या जिल्ह्यात वाघांची संख्याही वाढली आहे. त्याचाच परिणाम आज दुर्गापूर, ऊर्जानगर, वडगांव, दाताळा, अष्टभुजा या शहराला लागून असलेल्या भागात देखील वाघांचा नियमित वावर आहे.

मागील दोन वर्षात वाघांच्या हल्ल्यात ग्रामस्थांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गेल्यावर्षी ३० तर यावर्षी अवघ्या दोन महिन्यात १० जणांचा वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. मोहफूल व तेंदूपत्ता या दोन गोष्टींमुळे ग्रामस्थांना अगदी सहज पैसे मिळतात. पैशाच्या लोभात ग्रामस्थ जंगलात जातो.  वन विभाग गेल्या कित्येक वर्षांपासूव यासंदर्भात सातत्याने प्रबोधन करीत आहे.  मात्र तरीही ग्रामस्थ जंगलात जातच आहेत. मोहफुलांचे दर चार ते पाच पट अधिक झाले. मोहफुलांना अधिक पैसे मिळत असल्यामुळे ग्रामस्थ जंगलात जात आहेत. आज जंगलालगतच्या प्रत्येक गावात मोहफुलाची अवैध दारू विक्री होते. हा प्रकार जर थांबला नाही तर वन्यजीव-मानव संघर्षात माणसाच्या मृत्यूची संख्या अशीच वाढत राहणार आहे.

– एन.आर. प्रवीण,  मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर