करोना विषाणूच्या धास्तीने आखाती देशात काम करणारे अनेक जण रायगड जिल्ह्य़ात दाखल झाले आहेत. या सर्वावर जिल्हा प्रशासनाकडून देखरेख ठेवण्यात येत आहे. १४ दिवस घरातच थांबण्याचे निर्देश सर्वाना देण्यात आले आहेत.

रायगड जिल्ह्य़ातील महाड, श्रीवर्धन, म्हसळा आणि माणगाव तालुक्यातील अनेक जण आखाती देशात कार्यरत आहेत. मात्र करोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यातील बरेचसे जण भारतात परतले आहेत. आता या सर्वावर लक्ष ठेवण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. गेल्या २३ दिवसांत रायगड जिल्ह्य़ात ९३५ जण परदेशातून दाखल झाले आहेत. यातील ६५१ जणांना त्यांच्याच घरात अलगीकरण करून ठेवण्यात आले आहे, तर ९५ जणांना शासकीय अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. यातील बहुतांश जण हे आखाती देशातून आलेले आहेत. १८७ जणांचा १४ दिवसांचा अलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे.

दक्षिण रायगडमधील खाडीपट्टय़ात असलेल्या गावातील बहुतांश जण आखाती देशात काम करतात. मात्र आखाती देशांमध्येही करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. सौदी अरेबिया, दुबई, कुवेत, अबुधाबी येथून अनेक जण रायगड जिल्ह्य़ात परतले आहेत. या सर्वाना अलगीकरण करून राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी आणि महसूल कर्मचाऱ्यांकडून देखरेख ठेवली जात आहे. मात्र काही जणांकडून या निर्देशांचे उल्लंघन करीत आहेत.

श्रीवर्धन तालुक्यातील खारशेत भावे येथे तीन जण घरात अलगीकरण करून राहण्याचे निर्देश दिले असताना बाजारात फिरत असल्याचे दिसून आले. यानंतर तिघांवरही दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांमध्ये करोनाची लक्षणे सध्या तरी दिसून आलेली नाहीत, पण या प्रकारामुळे स्थानिक मात्र चांगलेच धास्तावले आहेत.