रत्नागिरी जिल्ह्यात एका करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १८ ते २३ व्यक्तींचा शोध घेतला जात असल्याने रूग्णसंख्येतही त्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र पुढे आले आहे. गेले काही दिवस जिल्ह्यात दररोज पन्नासपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून येत असून गेल्या २४ तासांत तर ही संख्या शंभरावर गेली आहे. त्यापैकी सर्वाधिक रूग्ण रत्नागिरी (४६) आणि चिपळूण (२७)  तालुक्यातील आहेत. याचबरोबर, अ‍ॅन्टीजेन चाचणीद्वारे १४ बाधित सापडले आहेत.  या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर म्हणाल्या की, करोनाचा फैलावर रोखण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या धोरणानुसार, करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सदस्यांचा शोध घेऊन तपासणी करण्यावर  आरोग्य विभागाने विशेष भर दिला आहे. एखाद्य रुग्णाचा तपासणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींची यादी तत्काळ बनवण्यात येते. त्यात जास्त जोखमीच्या व कमी जोखमीच्या व्यक्ती निश्चित केल्या जातात. जास्त जोखमीच्या व्यक्तींचे पुढील चौदा दिवसांपर्यंत अलगीकरण करुन लक्ष ठेवले जाते. तसेच आवश्यकता भासल्यास त्यांचा स्वाबही घेतला जातो. त्यामुळे रुग्णांचे लवकर निदान करणे शक्य होत आहे. अशा प्रकारे एका रूग्णामागे १८ ते २३ व्यक्तींची तपासणी केली जात असून राज्यात हे सर्वांत जास्त प्रमाण आहे.

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमानींची  तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात बारा ठिकाणी केंद्रे कार्यान्वित आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत या केंद्रांवर सुमारे ११ हजार प्रवाशांची तपासणी केली असून अडीचशे प्रवाशांची अँटीजेन चाचणी करण्यात आली आहे.

दरम्यान गेल्या २४ तासांत ३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यातील  पुरेखुर्द येथील ४९ वर्षीय रूग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात मरण पावला.  चाकाळे (ता.खेड) येथील ६६ वर्षांच्या रुग्णाचा रत्नागिरी येथे उपचारासाठी आणत असताना मृत्यू झाला.  हर्णे (ता. दापोली) येथील ७० वर्षीय रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनाबाधित मृतांची एकूण संख्या ८३ झाली आहे.

गेल्या ५ महिन्यांत मिळून जिल्ह्यात एकूण २३९१ सकारात्मक रूग्ण आढळून आले असून त्यापैकी  ७११ सक्रीय रूग्णांवर सध्या उपचार चालू आहेत. मंगळवारी दिवसभरात २६ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनामुक्त  रुग्णांची एकूण संख्या १५९७  झाली आहे.

जिल्ह्यात सध्या २०२ प्रतिबंधित क्षेत्रे असून त्यापैकी एकटय़ा चिपळूण तालुक्यात १००, खेड तालुक्यात ४३, तर रत्नागिरी तालुक्यात ३४ आहेत.

जिल्ह्यातील १४६ संशयित करोनाबाधित रूग्णांपैकी  ५१ रूग्ण कामथे (ता. चिपळूण) उपजिल्हा रुग्णालयात, ३९ रूग्ण रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात, तर दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठ केंद्रात २० आणि कळंबणी (ता. खेड) येथील रूग्णालयात १८ जण आहेत.      या व्यतिरिक्त,  मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र, तसेच इतर जिल्हयातून  आलेल्या ४९  हजार ४०५ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत.