दिवाळीमुळे गेल्या आठवडय़ात बंद असलेल्या नाशिक जिल्ह्य़ातील बाजार समित्यांमध्ये सोमवारी लाल कांद्याची मोठय़ा प्रमाणात आवक झाली. परिणामी कांद्याचे भाव प्रतिक्विंटलला ११०० रुपयांनी गडगडले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी धुळे जिल्ह्य़ात लिलाव बंद पाडून पारोळा मार्गावरील वाहतूक अडवून धरली. याच कारणास्तव धुळे जिल्ह्यात संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून पारोळा रस्त्यावरील वाहतूक अडवून धरली. शेतकऱ्यांचा रौद्रावतार पाहून बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत प्रतवारीनुसार भाव देण्याचे मान्य केल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजारात दिवाळीआधी कांद्याची आवक कमालीची घटली होती. त्यातही जो माल बाजारात येत होता, त्याचा पावसामुळे दर्जाही फारसा चांगला नव्हता. यामुळे दिवाळीपूर्वी गगनाला भिडलेले भाव आता कमी होऊ लागले आहेत.
दिवाळीनंतर शुक्रवारी काही बाजार समित्यांचे कामकाज सुरू झाले, परंतु, त्यानंतर पुन्हा सलग दोन दिवस सुटी असल्याने बाजारात म्हणावा तसा कांदा आला नाही. सोमवारी मात्र हे चित्र पूर्णपणे पालटले.
जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्यामुळे भाव कमी झाल्याचे लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी सांगितले.
भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र असंतोषाची तीव्र भावना निर्माण झाली. या असंतोषाचा धुळे जिल्हा बाजार समितीत उद्रेक झाला. त्या बाजारात सकाळी लिलावाला सुरूवात झाल्यावर व्यापारी २६०० रूपये प्रति क्विंटल दराने कांद्याची खरेदी करू लागले. इतर बाजारांमध्ये चार हजार रूपयांच्या आसपास भाव असताना व्यापारी कमी भावात कांदा खरेदी करत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव प्रक्रिया बंद पाडली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या जमावाने पारोळा रस्त्यावर ठिय्या देऊन वाहतूक बंद पाडली.
दरम्यानच्या काळात आंदोलनस्थळी आलेले बाजार समितीचे सभापती गुलाब कोतेकर, सचिव दिनकर पाटील, कुणाल पाटील, अरविंद जाधव आदींना शेतकऱ्यांनी घेराव घातला. अखेर शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेत संबंधितांनी व्यापाऱ्यांनी प्रतवारीनुसार ४२०० रूपयांपर्यंत भाव द्यावा, असा पर्याय सुचविला. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
११ हजार क्विंटल कांद्याची आवक
या दिवशी जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये नियमित कामकाजास सुरूवात झाली. लासलगाव बाजार समितीत एकाच दिवशी तब्बल ११ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यास सरासरी ३८९१ रूपये भाव मिळाला. उमराणे बाजार समितीत सुमारे २० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्याचा प्रति क्विंटलचा सरासरी भाव ३,९९१ रूपये होता.