पारनेर बाजार समितीत रविवारी झालेल्या लिलावात कांद्याचे भाव तीनशे रूपयांनी वधारले. रविवारी वीस हजार कांदा गोण्यांची बाजार समितीच्या आवारात आवक झाली.
गेल्या आठवडयात चांगल्या कांद्याला एक हजार रूपयांचा भाव मिळाला होता. रविवारी त्यात वाढ होउन तेराशे रूपयांचा भाव मिळाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याचे भाव कोसळल्याने बाजार समितीतील कांद्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे बाजारभावात तेजी आली असून पारनेरच्या कांद्याला दिल्ली, पंजाब, केरळ, तामिळनाडू आदी राज्यातून चांगली मागणी असल्याने भावातील तेजी कायम राहण्याची आशा आहे.
कांद्याची निर्यातही मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. तालुक्यातील कांदा निर्यातक्षम असल्याने व्यापाऱ्यांकडूनही या कांद्यास मोठी मागणी असल्याचे व्यापारी राजेंद्र तारडे यांनी सांगितले. कांदयाला भविष्यात चांगला भाव मिळेल या आशेने काही शेतकऱ्यांनी तो साठवून ठेवला आहे. वाढता उत्पादन खर्च, गारपीटीमुळे झालेले नुकसान याचा विचार करता कांदयाला किमान वीस रूपये प्रति किलो भाव मिळाला पाहिजे अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.