19 September 2020

News Flash

लागवडीपूर्वी कांद्याचा वांधा बियाण्यांचे दर दुपटीने वाढले!

कधी शेतकऱ्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळय़ांत पाणी आणणाऱ्या कांद्याचे यंदा लागवडीपूर्वीच वांधे झाले आहे. रोपे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असली तरी कांद्याच्या बियाण्यांचे दर

| June 16, 2014 04:17 am

कधी शेतकऱ्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळय़ांत पाणी आणणाऱ्या कांद्याचे यंदा लागवडीपूर्वीच वांधे झाले आहे. रोपे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असली तरी कांद्याच्या बियाण्यांचे दर प्रचंड भडकले आहेत. एक किलो कांदा बियाण्यासाठी शेतकऱ्याला तीन हजारांहून अधिक रक्कम द्यावी लागते. परिणामी, जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. बियाण्यांचे दर वाढल्याने कांदा लागवडीखालील क्षेत्र २५ ते ३० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी कांदा बियाण्यांचा प्रतिकिलो दर दीड हजार रुपये होता. विविध कंपन्यांनी तयार केलेले बियाणे यंदाही बाजारात दाखल झाले आहे. परंतु त्याची आवक कमी आहे. परिणामी, मागणीच्या तुलनेत उत्पादन आणि बाजारातील पुरवठा कमी असल्यामुळे कांदा बियाण्याचे दर दुपटीने वाढले. शेतकऱ्यांतून सर्वाधिक मागणी असलेल्या पंचगंगा सीड्स कंपनीच्या बियाण्यांचे दर यंदा प्रतिकिलो ३ हजार २०० रुपये एवढे झाले आहेत. हेच बियाणे गतवर्षीपर्यंत १ हजार २०० रुपये प्रतिकिलोने मिळायचे. तर ‘एलोरा न्यूट्रल सीड्स’ या कंपनीच्या बियाण्यांचे दर किलोला तीन हजार रुपये एवढे झाले असून, हेच बियाणे गेल्या वर्षी ८०० ते १ हजार रुपये दराने शेतकऱ्यांच्या पदरात पडत होते. निमकर सीड्स कंपनीच्या बियाण्याचे दर १ हजार ६०० पासून १ हजार ८०० रुपयांपर्यंत असून, कृषी कल्याण कंपनीच्या बियाण्यांची किंमत किलोला एक हजार रुपये एवढी आहे. मालव सीड्स कंपनीच्या बियाण्यांची किंमत ९०० रुपये एवढी असून, सर्वाधिक कमी दर जिंदल कंपनीच्या बियाण्यांचे आहेत. या कंपनीचे बियाणे ८०० ते एक हजार रुपये किलो दराने बाजारामध्ये उपलब्ध आहे. परिणामी, बरेच शेतकरी केवळ बियाण्यांच्या दराची विचारणा करून परत जात असल्याचेही कृषी सेवा केंद्राचे व्यापारी सांगत आहेत.
कांदा बियाणे उत्पादनास अवकाळीचा फटका बसलेला नाही. बाजारपेठेतील बियाण्यांचा पुरवठा सुरळीत न ठेवता कांदा बियाण्यांचे दरवाढ करण्याचे कारस्थान व्यापाऱ्यांचेच असून, गारपिटीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची ही तर लूटमार असल्याची प्रतिक्रिया तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा गावचे शेतकरी धनंजय भोसले यांनी व्यक्त केली. या प्रकाराकडे कृषी विभागासह प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
फेब्रुवारीपासून सतत होत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका कांदा बियाणे उत्पादनाला बसल्याचा दावा व्यापारी करतात. व्यापाऱ्यांनी लूट करण्यासाठी ते कारण पुढे केले असल्याचे शेतकरी सांगतात. गारपिटीमुळे यंदाच्या हंगामासाठी लागणारे कांदा बियाणे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना दिलेले ‘सीड्स प्लॉट’ अपयशी ठरले. अवकाळीचा मोठा फटका बियाण्यांच्या उत्पादनावर झाला असून, त्यामुळेच यंदा कांदा बियाण्यांचे उत्पादन घटले आहे. परिणामी बियाण्यांचे दर भरमसाट वाढले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 4:17 am

Web Title: increase onion seed rate before grow 3
Next Stories
1 राहत्यातील शेतक-यांना १०७ कोटींची मदत- विखे
2 कोयना धरण क्षेत्रात हलक्या सरी
3 ट्रकच्या धडकेने महिलेचा मृत्यू
Just Now!
X