महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने कायद्यात बदल केला. अत्याचाराची व्याख्याही विस्तारित झाली. तक्रार आल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करा, असे पोलिसांना आदेश असल्याने बलात्कार आणि विनयभंगाच्या नोंदीमध्ये वाढ झाली आहे.
 बीड जिल्हय़ात डिसेंबर २०१३ अखेर ८० बलात्कार आणि १२५ विनयभंगाच्या गुन्हय़ांची नोंद पोलीसदप्तरी झाली. सर्वाधिक घटनांची नोंद ऑक्टोबरनंतरची आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर अत्याचाराच्या व्याख्येची व्याप्ती वाढविण्यात आली. बाललैंगिक अत्याचार प्रकरणातही दुरुस्ती करण्यात आली. महिलेच्या इच्छेविरुद्ध स्पर्श केल्यानंतरही गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी गुन्हय़ाची व्याख्या केली गेली. परिणामी, नोंदींमध्ये वाढ झाली आहे.
 बीड जिल्हय़ात दोन महिन्यांत जवळपास बलात्काराच्या १२ तर विनयभंगाच्या जवळपास १८ गुन्हय़ांची नोंद झाली. विशेष म्हणजे बलात्काराच्या काही प्रकरणांत परस्परविरोधी गुन्हे नोंद झाले आहेत. तर विनयभंगाच्या गुन्हय़ातही असाच प्रकार होऊ लागला आहे. केज तालुक्यात १९ फेब्रुवारी रोजी विनयभंगाचे दाखल झालेले दोन गुन्हे परस्परविरोधी तक्रारीवरून नोंदवण्यात आले. यावरून वैयक्तिक हेवेदावे, परस्परातील वाद, कौटुंबिक कलह आणि स्थानिक राजकारण अशा गुन्हय़ांची नोंद वाढवण्यास कारणीभूत ठरत असल्याची निरीक्षणे पोलीस आवर्जून नोंदवत आहेत. नामलगाव येथील गणपतीच्या मंदिरात सोन्याची चेन चोरणारी महिला छुप्या कॅमेऱ्यात चित्रित झाली. चोरीचे िबग फुटणार हे लक्षात येताच या महिलेने याबाबत विचारणा करणाऱ्याविरुद्धच विनयभंगाची तक्रार दाखल केली. माजलगाव तालुक्यातही अलीकडील काळात बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्हय़ांची मोठय़ा प्रमाणात नोंद झाली. जिल्हा बँकेच्या प्रशासकाविरुद्धही कार्यालयातच विनयभंग केल्याचा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे. गुन्हे दाखल करताना झालेले राजकारण पाहता या गुन्हय़ाची चर्चा वेगळय़ा अंगाने होत आहे.