सांगली बाजारात मागणी; उत्पादनात मात्र घट

योग्य पाउस, उत्तम हवा, उष्णता यांचा चांगला परिणाम यंदाच्या बेदाण्याच्या गुणवत्तेवर झाला असून तासगाव बेदाण्याचा दर वधारला आहे. चांगल्या हवामानामुळे नाशिकपेक्षा सांगलीच्या द्राक्षांना ग्राहकांनी पहिली पसंती दिल्यामुळे या वर्षी बाजारात सांगलीकरांनी बाजी मारल्याने याचा परिणाम म्हणून बेदाणा उत्पादन २० टक्क्यांनी घटले असून सांगलीच्या बाजारात विक्रीसाठी १ लाख ४० हजार टन बेदाणा आला आहे.

बेदाणा निर्मितीसाठी तासगावच्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करीत अफगाणिस्तानच्या बेदाण्याला समर्थ पर्याय उपलब्ध केला असून गेल्या आठ-दहा वर्षांत देशातील सर्वाधिक बेदाणा उत्पादन करण्याचा बहुमानही मिळाला. यामुळे तासगाव बेदाणा हा बॅ्रण्ड तयार करीत दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल या बेदाणा निर्मितीमध्ये होते. मात्र याचा प्रत्यक्ष लाभ मिळविण्यासाठी करावी लागणारी यातायात प्रचंड आहे.

जिल्ह्य़ात १ लाख ५० हजार एकर क्षेत्रावर द्राक्षाचे पीक घेतले जाते. गेल्या वर्षी जिल्ह्य़ातील तासगाव आणि सांगलीच्या बाजारात १६ हजार गाडी म्हणजेच १ लाख ६० हजार टन बेदाणा तयार करण्यात आला होता, मात्र गेल्या वर्षी बेदाण्याचा बाजार १०० ते १४० रुपये किलो इतकेच राहिले. याचा फटका बऱ्याच उत्पादकांना बसला. दर मिळेल या आशेवर बेदाणा शीतगृहात ठेवणाऱ्या उत्पादकांनाही अखेपर्यंत दर मिळाला नाही. याचा दुहेरी फटका उत्पादकांना बसला. शीतगृहाचे भाडे मोजूनही अपेक्षित दर मिळाला नाही.

गेल्या वर्षी बेदाण्याला दर मिळाला नाही, यामुळे या वर्षी ७० टक्क्याहून अधिक शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीकडे लक्ष न देता केवळ बाजारपेठ समोर ठेवून द्राक्ष निर्मिती केली. या वर्षीच्या हंगामात थॉमसन, तास-ए-गणेश, सोनाका, शरद सीडलेस या द्राक्षांना बाजारात मागणीही चांगली होती. पोषक हवामान, पुरेशी उष्णता यामुळे द्राक्षामध्ये साखरेचे प्रमाण जादा असल्याने मुंबई, चेन्नई, कोइम्बतूर, कोलकाता, असनसोल या देशी बाजारपेठेबरोबरच बांगलादेशातील ढाका बाजारात चांगली मागणी नोंदली गेली. या तुलनेत नाशिकच्या द्राक्षामध्ये साखरेचे प्रमाण कमी असल्याने दरही चांगला मिळत गेला.

या वर्षी बेदाणा निर्मिती करण्याऐवजी मोठय़ा प्रमाणात बाजारपेठ समोर ठेवून द्राक्ष उत्पादन घेण्यात आले. बाजारात थेट विक्री करण्यासाठी द्राक्ष तयार होत असतानाच वेगळी प्रक्रिया करावी लागते. देशी बाजारपेठेसाठी मणी लांबट, गोडी जादा आणि वजन यासाठी प्रयत्न करावे लागतात. यासाठी द्राक्ष घड फुलोऱ्यात असतानाच त्याच्यावर जिब्रेलिक अ‍ॅसिडचा वापर करावा लागतो. मात्र बेदाणा निर्मितीसाठी असलेल्या द्राक्षामध्ये ही प्रक्रिया टाळली जाते. या हंगामात पूर्ण १४० दिवस झालेल्या द्राक्ष मण्यामध्ये २२ ते २४ ब्रिक्स साखरेचे प्रमाण मिळाल्याने गुणवत्तापूर्ण द्राक्षाबरोबरच गोडी जादा असलेली द्राक्षे मिळाली. साखरेचे प्रमाण जादा राहिल्याने बेदाण्याचे वजनही चार किलो द्राक्षामध्ये एक ते सव्वा किलो बेदाणा तयार झाला.

द्राक्षापासून बेदाणा तयार करण्यासाठी तोडणी, वाहतूक, निर्मिती शुद्धीकरण, निवड, पॅकिंग यासाठी येणारा खर्चही प्रतिकिलो १५ ते २० रुपये आहे. बेदाणा तयार होऊन मिळणारा दर गेल्या वर्षी ८० रुपयांपर्यंत खाली आल्याने हा आतबट्टय़ाचा धंदा करण्यापेक्षा बाजारात तयार द्राक्ष विक्री करण्यास उत्पादकांनी पसंती दिल्याने बेदाणा उत्पादन २० टक्क्यांनी घटले असले तरी विजापूर, सोलापूर जिल्ह्य़ातून ही उणीव भरून निघाली असून आहे.

सध्या बाजारात गुणवत्तेनुसार बेदाण्याचा दर निश्चित होत असून हिरवा आणि पिवळा बेदाण्याला प्रतवारीनुसार १५० ते २०० रुपये दर मिळत आहे, तर काळ्या बेदाण्याला ८० रुपयांपर्यंत दर आहे. गेल्या वर्षी मात्र काळ्या बेदाण्याला ४० ते ६० रुपये भाव मिळाला होता. सध्याचे दर हे टिकून असले तरी गणेशोत्सवाच्या दरम्यान या दरात आणखी वाढीची शक्यता असल्याने शीतगृहात बेदाणा उत्पादकांनी ठेवला आहे.

परदेशी द्राक्षाशी स्पर्धा

द्राक्ष उत्पादनात आघाडी घेत असतानाच नवनवे प्रयोग करण्यात येथील उत्पादक माहीर आहेत. द्राक्षाची नवनवीन बाजारपेठ शोधत असताना जागतिक पातळीवर चिलीच्या द्राक्षाशी स्पर्धा करावी लागत असतानाच निर्यातीमध्ये चालू हंगामाच्या अंतिम टप्प्यात अचानक वाढलेल्या तपमानाचा फटका निर्यातीला बसला. युरोपच्या बाजारात दर पडल्याने याचा निर्यातक्षम द्राक्षाला बसला असला तरी काही शेतकऱ्यांनी देशांतर्गत बाजारात लक्ष देऊन हा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केला.

दर्जामुळे भाव

  • या हंगामात स्थानिक पातळीवरील द्राक्ष उत्पादकांनी द्राक्ष निर्यात आणि बाजारपेठ समोर ठेवून द्राक्ष निर्मिती केल्याने बेदाणा उत्पादन २० टक्क्यांनी घटले असले तरी कर्नाटकातून ही उणीव भरून निघाली असून दरही चांगला मिळत आहे.
  • १ लाख ४० हजार टन बेदाणा सांगली व तासगावच्या बाजारात आला असून दर टिकून राहतील असे बेदाणा र्मचट असोसिएशनचे अध्यक्ष मनोज मालू यांनी सांगितले.

या वर्षी चांगल्या हवामानामुळे प्रतवारी, गोडी चांगली मिळाली. देशांतर्गत बाजारात गोडीदार द्राक्षांना चालू वर्षी चार किलोला प्रारंभीच्या काळात २०० ते २५० रुपये दर मिळाल्याने उत्पादकांनी बेदाणा निर्मितीला फाटा देत तयार माल बाजारात आणला. स्थानिक पातळीवर येऊन व्यापाऱ्यांनी रोख पसे देऊन मालाचा उठाव केल्याने दरही चांगला मिळाला, याचा परिणाम बेदाणा उत्पादनात घट झाली.

प्रवीण पाटील, रवींद्र पाटील, बोलवाड, मिरज.