लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी बीडमध्ये सहा विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. मात्र, वाढलेले मतदान, तसेच निकाल लवकर लागावा या साठी प्रत्येकी दोन टेबल वाढवावेत, या दृष्टीने निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. आयोगाने मंजुरी दिल्यास दोन तास अगोदर मतमोजणीचा निकाल लागू शकेल, अशी यंत्रणेला आशा आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे कडक सुरक्षा व्यवस्थेत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात ठेवण्यात आली आहेत. शुक्रवारी (दि. १६) मतमोजणी होणार आहे. यंत्रणेने मतमोजणीची तयारी पूर्ण केली. या साठी ६०० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना शुक्रवारी या बाबत प्रशिक्षण देण्यात आले.
बीडच्या निवडणुकीत ६९ टक्के मतदान झाले असल्यामुळे मतमोजणीच्या नियोजित प्रक्रियेनुसार प्रत्येक मतदारसंघ निहाय १४ टेबलवर मतमोजणी होईल. परंतु वाढलेल्या मतांमुळे प्रत्येक मतदारसंघात जास्तीचे दोन टेबल लावल्यास १२ टेबल वाढतील व मतमोजणी किमान २ तास आधी पूर्ण होईल. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोगाकडे प्रस्ताव पाठवला असून, आयोगाच्या मंजुरीनंतरच टेबल वाढवले जातील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी दिली.