News Flash

“महाराष्ट्रात चाचण्या वाढवा अन्यथा करोना रुग्ण आणि मृत्यू वाढतील”

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा कडक इशारा

प्रतिनिधिक फोटो

संदीप आचार्य 
मुंबई : महाराष्ट्रात वेगाने करोना रुग्ण वाढत असताना वारंवार सांगूनही करोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले जात नाही. याचे गंभीर परिणाम होऊन करोना रुग्ण आणि मृत्यू दोन्ही वाढतील हे लक्षात घ्या, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला दिला आहे.

कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, पंजाब, दिल्ली, तेलंगणा आदी अनेक राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा खूप जास्त प्रमाणात करोना चाचण्या करण्यात येतात. जास्तीतजास्त चाचण्या वेळेत केल्यास रुग्णांचा लवकर शोध लागू शकतो तसेच त्याची जीवही वाचू शकतो, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अपर सचिव आरती आहुजा यांनी १६ सप्टेंबर रोजी पत्र लिहून कळवले आहे. महाराष्ट्रात १० लाख लोकांमागे सरकारी ४२००० चाचण्या केल्या जात आहेत. यात करोना पॉझिटिव्ह दर हा २१.५ टक्के आहे. आम्ही गेल्या आठवड्यात १० लाख लोकांमागे रोज सरासरी किती चाचण्या केल्या जातात याची माहिती घेतली असता रोज सरासरी ३७७ चाचण्या केल्या जात असल्याचे दिसून आले असून ही गंभीर बाब आहे. त्यामुळे एका महिन्यात सरासरी जास्तीत जास्त रोज किती चाचण्या झाल्या याची माहिती घेतली असता १० लाख लोकांमागे ५८३ चाचण्या घेण्यात आल्या असून यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर हा २६.९ टक्के होता.

करोना साठी अॅन्टिजेन चाचण्या करण्यामागे तात्काळ रुग्ण शोध घेणे, लागण झालेल्या विभागात तसेच करोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांच्या तात्काळ तपासणीसाठी ही चाचणी योग्य असली तरी लक्षणे असलेल्या व अॅन्टिजेन चाचणी निगेटिव्ह आलेल्या लोकांची आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असल्याचे अपर सचिवांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. यातील महत्वाचा भाग म्हणजे अॅन्टिजेन चाचणीसाठी स्वॅब घेतानाच दोन स्वॅब घ्यावे जेणेकरून काही शंका आल्यास आरटीपीसीआर चाचणीही करता येईल व रुग्णाला पुन्हा चाचणीसाठी यावे लागणार नाही. दुर्दैवाने त्याचीही अंमलबजावणी महाराष्ट्रात होताना दिसत नाही.

महाराष्ट्रात ५३९ करोना चाचणी प्रयोगशाळा असून यापैकी २१८ प्रयोगशाळेत १०० पेक्षा कमी चाचण्या केल्या जातात. याप्रयोगशाळांच्या क्षमतेचा पूर्ण वापर केला जावा. त्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नेमणे त्यांच्या शिफ्ट पासून योग्य व्यवस्थापन करण्यासही सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटीपेक्षा जास्त असून आतापर्यंत ५८ लाख ७२ हजार चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये १२ लाख आठ हजार लोकांना म्हणजे २०.५८ टक्के लोकांना करोना झाला आहे. महाराष्ट्रात करोनाला रोखण्यासाठी व उपाययोजना सुचविण्यासाठी सरकारने नेमलेल्या ‘राज्य टास्क फोर्स’ने यापूर्वीच आपल्या अहवालात राज्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यास सांगितले होते. टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणाले की, करोना चाचणी लोकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी जागोजागी ‘किऑक्स’ उभारण्याची शिफारसही आम्ही केली होती. मुंबईत किऑक्स प्रत्येक वॉर्डात उभारण्याची घोषणाही झाली होती. याठिकाणी लोकांनी जाऊन आपले स्वॅब द्यायचे होते. या केंद्रात केवळ स्वॅब गोळा केले जाणार होते व तेथून ते प्रयोगशाळेत नेण्याची कल्पना होती.

आजपर्यंत त्याची अमलबजावणी झाली नसल्याची खंत डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केली. मास्क, सोशल डिस्टसिंग व सॅनिटाइजरचा वापर हे करोनाला रोखण्यासाठी प्रमुख शस्त्र असले तरी आज त्याबाबतही राज्यात कोठेच धड अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि मोठ्या प्रमाणात चाचण्या करा हे वारंवार सांगूनही त्यावरही ठोस निर्णय होत नाही, असे राज्याचे प्रमुख आरोग्य सल्लागार व माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले. पुरेशा चाचण्याच झाल्या नाहीत तर करोना रुग्ण लवकर कसे शोधणार आणि मृत्यू कसे रोखणार असा सवालही डॉ. सुभाष साळुंखे यांनी केला आहे. नेमका हाच कळीचा मुद्दा घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अपर सचिवांनी करोना चाचण्या वाढविण्यासाठी पत्रातून कडक समज दिली आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 2:09 pm

Web Title: increase tests in maharashtra otherwise corona patients and deaths will increase says union ministry of health scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 हे एकप्रकारे श्रमिकांचे खूनच; रोहित पवारांनी मोदी सरकारच्या उत्तरावर व्यक्त केली नाराजी
2 राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी विरोधकांचा कृषी विधेयकांना विरोध – चंद्रकांत पाटील
3 पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल, तर तो अजित पवारांनीच; निलेश राणेंची शिवसेनेवर टीका
Just Now!
X