पाऊस कमी झाल्याने मराठवाडय़ातील पिकाच्या उत्पादनावर २० टक्के परिणाम होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. औरंगाबाद विभागात ४६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र, पाऊस पडला नाहीतर स्थिती हाताबाहेर जाईल. उशिरा पाऊस झाल्याने कापूस व अन्य पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होईल. आतापर्यंत आलेला पाऊस लक्षात घेता २० टक्के उत्पादन घटेलच, असा दावा केला जात आहे. दरम्यान, पाऊस नसल्याने काही तालुक्यांमध्ये पेरण्याही रखडल्या आहेत. विशेषत: जालना जिल्हय़ातील जाफराबाद, बदनापूर आणि मंठा या तालुक्यांत सर्वात कमी पाऊस नोंदवला गेला आहे. परिणामी, शेतकरी हवालदिल झाला आहे.
बीड जिल्हय़ातील गेवराई, धारूर आणि आष्टी हे तीन तालुके वगळता अन्य तालुक्यांत काही अंशाने बरा पाऊस झाल्याने या जिल्हय़ात पेरणीचे प्रमाण अधिक आहे. कापसाचा पेरा १ लाख ९७ हजार ५०० हेक्टरावर झाल्याच्या नोंदी आहेत. अन्य पिकांची पेरणीही या जिल्हय़ात तुलनेने अधिक आहे. औरंगाबाद विभागातील जालना आणि औरंगाबाद या दोन्ही जिल्हय़ांत पाऊस तसा कमीच आहे. जालना जिल्हय़ातील मंठा तालुक्यात सर्वात कमी ३७.५ मि.मी. एवढाच पाऊस झाला. बदनापूरमध्ये ३९.८ तर जाफराबादमध्ये ५८ मि.मी. पाऊस झाल्याने येथील पेरण्या रखडलेल्या आहेत. औरंगाबाद जिल्हय़ातील वैजापूर, गंगापूर आणि पैठण या तीन तालुक्यांत अनुक्रमे ८४.८, ६४.९७ व ६१.५७ टक्के पाऊस पडला. त्यामुळे या तीन तालुक्यांत पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या जाणवत आहे. लातूर जिल्हय़ातील जळकोट तालुक्यात कमी पाऊस झाला आहे. नेहमीचा दुष्काळी प्रदेश अशी ओळख असणाऱ्या उस्मानाबाद जिल्हय़ात मात्र तुलनेने अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या असल्या तरी आता पाऊस आला नाही तर उत्पादकता घटेलच, असे सांगितले जात आहे. उशिरा झालेल्या पेरण्यामुळेही २० टक्के उत्पादन घटेल.
मराठवाडय़ातील औरंगाबाद जिल्हा वगळता अन्य जिल्हय़ांमध्ये उपलब्ध पाणीसाठे आणि टँकर हे प्रमाण काहीअंशी समर्थनीय असले तरी औरंगाबाद जिल्हय़ात मात्र अधिक पाणीसाठे असतानाही टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. सध्या ३२३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या ७१० फेऱ्या पूर्ण होत आहेत. मूलत: पाणीपुरवठय़ाच्या योजनांची नीटपणे अंमलबजावणी झाली नसल्यानेही जिल्हय़ात टँकरची संख्या वाढते आहे. जिल्हय़ातील एकूण १७६ गावांपैकी ९३७ पाणीपुरवठा योजना सुरू आहे. २० प्रादेशिक पाणीपुरवठा व आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सुरू असणाऱ्या ५ योजना यशस्वी असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागातील अधिकारी करत असले तरी जलस्वराज्य आणि भारत निर्माणच्या अनेक योजना रखडलेल्या आहेत.
दरडोई खर्चाच्या ४४ योजना ठप्पच
लोकसंख्येचा विचार करता प्रतिव्यक्ती २ हजार ३२७ रुपयांपर्यंत पाणीपुरवठय़ाची योजना मंजूर केली जाते. जिल्हय़ातील ४४ पेक्षा अधिक योजनांचा खर्च या निकषापेक्षा अधिक असल्याने त्याची मंजुरी राज्यस्तरावर अडकली आहे. त्यामुळे या गावातील पाणीपुरवठा योजनांचे काम ठप्पच आहे. परिणामी, टँकरची मागणी झाली, की तेथे पाणीपुरवठा करावाच लागतो. या योजना शासनस्तरावर मंजूर करून आणणे हे जिल्हा परिषदेसमोर आव्हानात्मक काम आहे. जिल्हय़ातील ३६ गावांमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्यांमध्ये वाद आहेत. ११ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. तर १३ योजनांमध्ये सरासरी ४ लाख ते ७ लाख रुपयांपर्यंत अपहार झाला आहे. ९०हून अधिक पाणीपुरवठा योजनांचे काम संथपणे सुरू असल्याचे जिल्हा परिषदेचे अधिकारी मान्य करतात. परिणामी, टँकरची संख्या वाढते आहे.
जलस्वराज्य टप्पा-२ मध्ये ३५ गावांचा समावेश
जागतिक बँकेच्या सहकार्याने जलस्वराज्य टप्पा-२मध्ये ३५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. विशेषत: शहरालगतच्या गावांमधील पाणीपुरवठय़ाच्या योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत, तर ज्या गावात लोकसंख्या ५००पेक्षा कमी आहे व सलग तीन वर्षे जेथे टँकरने पाणीपुरवठा होतो, अशा गावांसाठीही पाणीपुरवठय़ाच्या योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
पावसाच्या हुलकावणीने टँकरची संख्या वाढू लागली
वार्ताहर, नांदेड
 जूनपाठोपाठ जुलै महिन्यातही पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात टँकरची संख्या वाढू लागली आहे. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयातील ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. राज्याच्या अन्य काही भागांप्रमाणे नांदेडलाही पावसाने जबरदस्त हुलकावणी दिली आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु जुलै महिना उलटत चालला तरी पावसाची मात्र हजेरी नाही. पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यात टँकरची संख्या वाढू लागली आहे. उन्हाळय़ात केवळ चार ते पाच टँकर होते. पण भर पावसाळय़ात आता ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूअसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. ते म्हणाले, टँकरची मागणी होताच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठीचे सर्व अधिकार राज्य शासनाच्या सूचनेनुसार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. सध्या नायगाव, माहूर या तालुक्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नांदेड शहर व परिसरातील वसाहतींना पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणातील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. आजमितीस ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रातही पाऊस नसल्याने नांदेड शहरावर पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गोदावरी नदीतून पाणी उपसा करणाऱ्या सर्व मोटारी बंद करण्याचे निर्देश आज जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. वीज मंडळाने गोदावरी नदीतून उपसा करण्यासाठी दिलेले सर्व विद्युतजोडण्या तोडण्यात येतील असे स्पष्ट केले आहे. जुलै महिन्यात पाऊस पडेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. परंतु पावसाच्या विश्रांतीने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. कधी बी-बियाणे मिळत नाहीत, कधी पाऊस जास्त होतो तर कधी असा दुष्काळ पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होतात. या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने तात्काळ शेतांचे सर्वेक्षण करावे व नुकसानीचा मावेजा द्यावा, अशी मागणी समोर आली आहे.
दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
एकीकडे दुबार पेरणीचे संकट तर दुसरीकडे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असलेल्या वेगवेगळय़ा भागांतील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. बिलोली तालुक्यातील कासराळी येथील सायन्ना गंगाराम ठक्करवाड (६०) व उमरी तालुक्यातल्या गोळेगाव येथील कोंडिबा भंगाजी बोईनवाड (३५) या शेतकऱ्यांनी गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.