जिल्ह्यात करोना विषाणुचा प्रसार आणि प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. रविवारी मध्यरात्री शिरपूर येथील दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्य़ातील मृतांची संख्या १४ वर गेली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १०९ झाली असून ५७ जण करोनामुक्त झाले आहेत. सध्या ३० रुग्णांवर श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात तर आठ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात कोविड-१९ विषाणुचा पहिला रुग्ण साक्री येथे १० एप्रिल रोजी आढळला होता. नंतर हळू हळू इतर भागातही रुग्ण आढळत गेले. जिल्ह्यात करोना विषाणुची लागण होण्याचे प्रमाण टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात वाढले. तीसऱ्या टप्प्यात त्याचा वेग काहीसा नियंत्रणात आला. २२ मे रोजी एकाच दिवशी तब्बल २१ नवे रुग्ण आढळले. यात धुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांचा सुध्दा समावेश होता. शिंदखेडा तालुक्यातील वाडी शेवाडी येथे मुंबईहून आलेल्या दोघा भावांना करोनाची लागण झाली आणि त्यांच्यामुळे वडिलांना लागण झाली. रविवारी ६८ वर्षांच्या वडिलांचा धुळ्यात हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्री दोन जणांचा मृत्यू झाला. दोघेही रुग्ण शिरपूर येथील आहेत. शिरपूरच्या काझी नगरातील ६७ वर्षांच्या वृध्दाचा करोना अहवाल सकारात्मक आला होता. तसेच शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावातील ४८ वर्षांच्या व्यक्तीचा अहवाल २२ मे रोजी सकारात्मक आला होता. दोघांवर हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु होते. दोघांचा मध्यरात्रीच मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. शिरपूर शहरातील काझी नगरातील वृध्दाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घरांमध्येच ईदचे नमाज पठण

पारंपरिक पध्दतीने रमजान ईदनिमित्त सामुहिक नमाज पठण करोनामुळे यंदा धुळ्यात मुस्लीम बांधवांना करता आले नाही. धर्मगुरुंनी यंदा सामुहिक नमाजसाठी एकत्र न येण्याचा आणि घरातच राहून ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे सोमवारी शहरातील मुस्लिम बांधवांनी घरोघरी सकाळी ईदचे नमाज पठण केले. करोनापासून लवकर सुटका करावी, देशातील मजुरांचे सुरु असलेले हाल थांबावेत, अशी प्रार्थना करण्यात आली. पोलिसांनी दक्षता म्हणून पांझरा नदीकिनारी असलेल्या ईदगाह मैदानात बंदोबस्त ठेवला होता. तसेच ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने परिसरावर देखरेख ठेवण्यात आली. शहरातील मुस्लिमबहुल भाग असलेल्या वडजाई रोड, शंभर फुटी रोड, ऐंशी फुटी रोड, मच्छिबाजार परिसरात देखील बंदोबस्त आहे. लोकांनी गर्दी करु नये, शारीरिक अंतर पथ्याचे पालन करीत घरातच ईद साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव आणि पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित यांनी केले आहे.