सध्या टाळेबंदीच्या काळात इतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी सायबर गुन्ह्यांनी डोके वर काढले आहे. राज्यात ४००हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली असून पालघर जिल्ह्यात १० गुन्ह्यांची नोद झालेली आहे.

करोनामुळे टाळेबंदी घोषित करण्यात आलेली आहे. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी झालेले आहे. मात्र या काळात सायबर गुन्ह्यात सर्वत्र वाढ होत आहे. या गुन्ह्यांमध्ये आक्षेपार्ह टिकटॉक चित्रफिती बनविणे, समाज माध्यमांवर भडकाऊ पोस्ट टाकणे, करोना महामारीला धार्मिकतेचा रंग देणाऱ्या पोस्ट्स टाकणे, करोना विकाराबाबत चुकीची माहिती देणे, करोनाग्रस्तांची नावे जाहीर करणे, विविध राजकीय नेत्यांची  बदनामी करणाऱ्या पोस्ट टाकणे किंवा छायाचित्रे टाकणे, त्यांच्यावर हीन दर्जाच्या टीका करणे, सर्वसाधारण नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणे इत्यादी गुन्ह्यंचा समावेश आहे. पालघर जिल्ह्यातील मागील काही दिवसांत १० गुन्हे नोंद झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर कक्षाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ भालसिंग राजपूत यांनी दिली.

ऑनलाइन खाद्य्पदार्थ मागवताना सावधान!

नागरिकांना फसवण्यासाठी भामटे विविध क्लृप्तय़ा लढवत आहेत. टाळेबंदीच्या काळात उपहारगृहे सुरू नसली तरी पार्सल आणि फूड अ‍ॅपद्वारे ऑर्डर देण्याची मुभा देण्यात आलेली आहे. मात्र याचा फायदा सायबर भामटे उठवत आहेत. मोठय़ा व प्रसिद्ध रेस्टॉरंटसच्या नावाची बनावट संकेतस्थळे उघडून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे ऑनलाइन ऑर्डर करताना उपहारगृहाचे संकेतस्थळ अधिकृत असल्याची खात्री करा, तसेच डेबीट कार्डाची माहिती देऊ  नका आणि पोलिसांत तक्रार करा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.