News Flash

रक्तपेढय़ांची दमछाक!

दत्ताजी भाले रक्तपेढीत काम करणाऱ्या भारत दांडगे यांच्या मागे सध्या मोठी घाई असते. ते सकाळी घरून निघतात.

| August 2, 2014 02:15 am

दत्ताजी भाले रक्तपेढीत काम करणाऱ्या भारत दांडगे यांच्या मागे सध्या मोठी घाई असते. ते सकाळी घरून निघतात. पण केव्हा परतणार, ते त्यांना माहीत नसते. याचे कारण डेंग्यूसदृश रुग्णांना द्यावयाच्या रक्तातील प्लेटलेट विघटनाचे काम ते करतात. मात्र, कधी चार तर कधी सहा तास अधिकचे काम त्यांना करावे लागत आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये डेंग्यूसदृश रुग्णांसाठी ८०१ प्लेटलेटच्या पिशव्या पुरवाव्या लागल्या. या वर्षी रुग्णांची संख्या एवढी की, आतापर्यंत १ हजार ८५८ प्लेटलेटच्या पिशव्या दिल्या गेल्या आहेत. रक्तदानानंतर सहा तासांत रक्ताचे विघटन करून प्लेटलेट वेगळ्या कराव्या लागतात. परिणामी रक्तपेढय़ांवरील ताणही बराच वाढला आहे. शासकीय रक्तपेढीत तेवढी धावपळ नसली, तरी रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात.
या वर्षी जुलै महिन्यात ९० तपासण्या करण्यात आल्या. यातील २७ जणांना डेंग्यू असल्याचे स्पष्ट झाले. सर्वसाधारणपणे ५० चाचण्या केल्यावर सरासरी ३ ते ७ रुग्णांना डेंग्यू दिसून यायचा. आता हे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. प्लेटलेट या शब्दाला मराठीत ‘बिंबिका’ म्हटले जाते. डास चावल्यामुळे या पेशींचे प्रमाण कमी होते. परिणामी रुग्णाचे इतर अवयव निकामी होऊ लागतात व रुग्ण दगावतो. अशा रुग्णांना केवळ प्लेटलेटच द्याव्या लागतात. प्लेटलेट तयार करण्यासाठी रक्तदान होणे अधिक गरजेचे असते. सहा तासांच्या आत रक्ताचे विघटन करण्यासाठी भारत दांडगेंसारखे अनेकजण कार्यरत आहेत.
याच रक्तपेढीतील तांत्रिक व्यवस्थापक सुषमा लाटकर म्हणाल्या की, सध्या आम्ही सर्वजण कमालीचे व्यस्त आहोत. दर दहा मिनिटांनी प्लेटलेट मागणीसाठी रुग्णांचे नातेवाईक येतात. डेंग्यूसदृश आजाराचे हजार ते बाराशे रुग्ण असावेत, असे सांगितले जाते. एका रुग्णाला प्लेटलेटच्या एका पिशवीसाठी ७५० रुपये खर्च येतो. औषधांचा खर्च वेगळा. एका रुग्णावर होणारा सरासरी खर्च ५ ते ७ हजार रुपयांच्या घरात जात असला, तरी सरकारी यंत्रणा मात्र ढिम्म आहे. महापालिकेकडे डासांचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी केवळ १० धूर फवारणी यंत्रे आहेत. गाडीवर धूर फवारणी असणाऱ्या दोन यंत्रांपैकी एक बंद आहे. या यंत्रणांसाठी महापालिकेकडून केवळ १० लाख रुपयांची तरतूद ठेवण्यात आली. लागणारी औषधे राज्य सरकारकडून मिळतात, असे अधिकारी सांगतात. मात्र, ती किती आहेत, याची आकडेवारी उपलब्ध नाही.
गेल्या काही दिवसांत केलेल्या रक्ताच्या तपासण्यांवरून रुग्णांची संख्या वाढली आहे. ९० पैकी २७ जणांना आजार झाल्याचे आढळून आले. आजार पसरण्याची तीव्रता वाढल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून मोठा पाऊस झाला नाही आणि कडक ऊनही पडत नाही. परिणामी डासांचे प्रमाण वाढले आहे.
डॉ. गट्टाणी, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 2:15 am

Web Title: increases demand for blood platelets
Next Stories
1 पाऊस थांबल्यानंतरच कसारा घाटात दुरुस्ती
2 ‘प्लँचेट’ समर्थकांना अंनिसचे २१ लाखांचे आव्हान
3 ‘लोकसभेत दुप्पट यशामुळेच निम्म्या जागांवर आमचा हक्क’