ग्रामीण भागापेक्षा शहरांचे तापमान गेल्या दोन दशकात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढले आहे. पृथ्वीचे सरासरी तापमान दरवर्षी वाढत असून आता ते ०.८ अंश सेल्सिअसजवळ गेले आहे. २०-२५ वर्षांपूर्वीच ही बाब शास्त्रज्ञांच्या लक्षात आली आणि ग्रामीण व शहरी भागातील तापमानाच्या या अंतराला त्यांनी ‘अर्बन हीट आयलंड’ हे नाव दिले. भारतातील जवळपास सर्वच शहरे ‘अर्बन हीट आयलंड’च्या कवेत आली असली तरीही उपाययोजना शून्य आहेत. त्या तुलनेत न्युयॉर्कमध्ये मात्र गेल्या पाच वर्षांंपासूनच नासाच्या शास्त्रज्ञांनी त्यावर अभ्यास सुरू केला असून काही उपाययोजनांची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
गेल्या १०० वर्षांंच्या इतिहासात २०१४ हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे. मात्र, सध्याची परिस्थिती बघता २०१५ हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याचे संकेत शास्त्रज्ञांनी दिले आहेत. ‘अर्बन हीट आयलंड’ मुळे वर्षभर रात्रीचे तापमानसुद्धा वाढत असल्याचे अभ्यास आता समोर आला आहे. दिवसरात्र तापमानवाढीची ही प्रक्रिया अशीच कायम राहिल्यास भविष्यात शहरात राहणे कठीण होईल, असा इशारा अभ्यासकांनी दिला आहे.

चर्चा होणार
शहरातील रस्त्याच्या दुतर्फा, घराजवळ आणि मोकळ्या जागेत वृक्ष लावणे, घरांना गडद रंगाऐवजी फिका रंग द्यावा. वस्ती दाटून नव्हे, तर विरळ असावी. घरांना काचा व धातूचा वापर कमी करावा. जलसाठय़ाचे प्रमाण वाढवणे आदी उपायांची जंत्री केंद्रीय पर्यावरण, वने आणि जल, वायू परिवर्तन मंत्रालयाच्या क्षेत्रीय सशक्त समितीचे सदस्य प्रा. सुरेश चोपणे यांनी सादर केली. प्रकाश जावडेकर यांनी मंत्रालयाच्या पुढील बैठकीत ही जंत्री सादर करण्यात येईल आणि अभ्यास करून त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.