उस्मानाबाद  जिल्ह्यात करोनाचा कहर दिवसेंदिवस अधिक वाढत चालला आहे. रविवारी त्यात 24 रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 17 जणांसह बाहेरील जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 7 जणांचा यात समावेश आहे. त्यामुळे रविवारी दिवसभरात एकुण 24 रुग्णांची नव्याने भर पडली, तर दिवसभरात तिघांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

रविवारी लातूर येथे पाठविण्यात आलेले 100 आणि अंबाजोगाई येथे पाठविण्यात आलेले 157 असे एकूण 257 जणांचे अहवाल अजून प्राप्त झालेले नाहीत. उस्मानाबादेत अद्ययावत करोना चाचणी प्रयोगशाळा उभारणीस मंजुरी मिळून महिना उलटून गेला, तरी अद्याप ती कार्यान्वित नसल्याने रुग्णालय प्रशासनाला लातूर व आंबेजोगाईवर विसंबून राहावे लागत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शनिवारी 152 जणांचे स्वॅब तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते. यातील 17 पॉझिटिव्ह आढळून आले असून 5 संदिग्ध आले आहेत. उर्वरित 137 निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये 3 रुग्ण उस्मानाबाद तालुक्यातील आहेत. 1 उस्मानाबाद शहरातील महादेव गल्ली भागातील तर तालुक्यातील भिकारसारोळा आणि कसबे तडवळे येथे प्रत्येकी 1 रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

उमरगा तालुक्यात तब्ब्ल 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यात उमरगा शहरातील आरोग्य नगर, पतंगे रोड भागातील 5 जण असून यात एका 10 वर्षीय मुलाचाही समावेश आहे. तालुक्यातील एकोंडी येथील दोघांचा अहवालही पॉझिटिव्ह आहे. तुळजापूर तालुक्यात 5 पॉझिटिव्ह वाढले असून, यात जळकोट येथील एक तरुण, तुळजापूर शहरातील 2 महिला, खडकी तांडा येथे पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील 1 तर सावरगाव येथील एक जण पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. परंडा तालुक्यातही आवारपिंपरी येथे 2 महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. दोन्ही महिला पूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील आहेत.

तर बाहेरील जिल्ह्यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 7 वर पोहचली असून त्यांचे स्वॅब त्या-त्या जिल्ह्यात घेण्यात आले होते. जिल्ह्यात 12 जुलैपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 378 वर पोहचली असून 237 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर 124 जणांवर वेगवेगळ्या रुग्णायांत उपचार सुरू असून 17 जणांचा मृत्यू झालेला आहे.