करोनाच्या वाढत्या संसर्गाचा फटका कारागृहातील कैद्यांना बसू नये म्हणून सातारा व कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातून १६७ कैद्यांची तात्पुरत्या जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. यासंदर्भात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य उच्च अधिकार समितीने निर्देश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयात कारागृहातील कैद्यांना करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मुक्त करण्याबाबत जनहीत याचिका दाखल झाली होती. यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये तसेच उच्च न्यायालयाच्या राज्य उच्चाधिकार समितीने दिलेल्या निर्देशान्वये सातारा कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कळंबा येथून एकूण ५७३ अंतरिम जामीन अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १८८ अंतरिम जामीन अर्ज मंजूर करण्यात आले. त्यानंतर सातारा व कळंबा कारागृहातून न्यायाधीन कैद्यांचे अंतरिम जामीन अर्ज संबंधित न्यायालयाकडे पाठविण्यात आले. जामीन अर्जाचे कामकाज पाहण्यासाठी मोफत विधीज्ञांची नेमणूक करुन २३ मार्च ते १५ जून या कालावधीमध्ये मंजूर अंतरिम जामीन अर्ज कागदपत्रांची पूर्तता करुन एकूण १६७ कैद्यांना मुक्त करण्यात आले. संबंधीत कारागृहांना जामिनावर मुक्त केलेल्या कैद्यांना करोना संसर्गाबाबत योग्य ती खबरदारी घेऊन घरी पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीमध्ये सातारा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे मार्गदर्शनाखाली करोना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून जिल्हा सत्र न्यायालयाची इमारत व परिसर निर्जंतूक करुन घेण्यात आला आहे, असे सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी सांगितले.