सुनील बागूल यांना शिवसेनेने सर्वकाही दिले असताना आपल्या अनुचित वागणुकीने त्यांनी पक्षशिस्त मोडली. यापुढे पक्षात कोणत्याही प्रकारची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बागूल यांच्यावरील कारवाईचे समर्थन केले. शिवसेना जिल्हाप्रमुखांसह काही नेते व कार्यकर्त्यांबरोबर बुधवारी मुंबई येथे ठाकरे यांची बैठक झाली.
या बैठकीत त्यांनी लवकरच शहर व जिल्हा कार्यकारिणीतील इतर पदाधिकारी जाहीर करण्यात येतील, अशी ग्वाही दिल्याची माहिती बैठकीस उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली.
ममता दिनी झालेल्या वादानंतर माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर बागूल यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, महापालिकेतील पदाधिकारी अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, नगरसेवक सचिन मराठे, शिवाजी सहाणे, डी. जी. सूर्यवंशी आदींनी कार्याध्यक्षांची भेट घेतली. बागूल यांना शिवसेनेने सर्वकाही दिले होते, तरीही त्यांनी अनुचित वर्तणूक केली, असे ठाकरे यांनी सांगितले. बागूल यांना दोन वेळा जिल्हाप्रमुखपद दिले. याशिवाय सहसंपर्कप्रमुखपद मिरविणारे महाराष्ट्रातील ते एकमेव जिल्हाप्रमुख होते. विधानसभेची उमेदवारी दिली. त्यांच्या बंधूला स्थायी समिती सभापतीपद दिले. असे असताना अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी करावयास नको होते.
 एखाद्या कार्यकर्त्यांस किंवा पदाधिकाऱ्यास पक्षातून काढताना निश्चितच आपणासही दु:ख होते. आतापर्यंत जिल्ह्यातील शिवसेना त्यांच्याच ताब्यात होती. तरीही पक्षाची वाताहत का झाली, त्यांच्या नसण्याने शिवसेनेचे असे अजून किती नुकसान होणार आहे, असा सवाल करून नुकसान झाले तरी चालेल; परंतु यापुढे कोणत्याही प्रकारची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला. लवकरच शहर व जिल्ह्यातील कार्यकारिणीतील उर्वरित पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
या वेळी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, सचिन मराठे, शिवाजी सहाणे यांनी आपण शिवसेनेतच राहणार असून एकदिलाने काम करणार असल्याची ग्वाही दिली.